दिव्या देशमुखचे ग्लोबल चेस लीगमध्ये पदार्पण   

अल्पाइन पाइपर्सकडून खेळणार

बंगळुरू : भारतीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिचे ग्लोबल चेस लीगमध्ये पदार्पण होणार असून, ती गतविजेत्या अल्पाइन पाइपर्स संघाकडून खेळणार आहे. ग्लोबल चेस लीगचा चौथा हंगाम 5 सप्टेंबरपासून बंगळुरूमध्ये सुरू होणार आहे.नुकताच अर्जुन पुरस्काराने सन्मानित झालेली 20 वर्षीय दिव्या जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू मॅग्नस कार्लसन, अनिश गिरी, विदित गुजराथी आणि व्होलोदर मुरझिन यांच्यासह अल्पाइन पाइपर्सच्या मजबूत संघाचा भाग असेल, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली. आतापर्यंत प्रामुख्याने वैयक्तिक स्पर्धांमध्ये खेळलेल्या दिव्याने रॅपिड बुद्धिबळाच्या वेगळ्या स्वरूपाबाबत आणि फ्रँचायझी आधारित सांघिक स्पर्धेत खेळण्याबाबत उत्सुकता व्यक्त केली आहे. 
 
घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याची संधी मिळणार असल्यानेही ती आनंदी आहे. हे माझे पदार्पण असल्याने मी निश्चितच खूप उत्सुक आहे. ही इतर कोणत्याही बुद्धिबळ स्पर्धेसारखी नाही. या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रेक्षक उपस्थित राहतील, जे खूप छान असेल. तसेच, या स्पर्धेचे स्वरूप पारंपरिक बुद्धिबळापेक्षा वेगळे असल्याने ते खेळताना मजा येईल. भारतात खेळणे नेहमीच आनंददायी असते, असे दिव्याने सांगितले. जगातील सर्वोत्तम बुद्धिबळपटूंपैकी एक असलेल्या मॅग्नस कार्लसनसोबत एकाच संघात खेळण्याची संधी मिळाल्याने उत्सुकता वाढली असली, तरी संघातील इतर खेळाडूंची ताकदही तितकीच महत्त्वाची असल्याचे दिव्याने नमूद केले.
 
रॅपिड बुद्धिबळाच्या या स्वरूपाची नेमकी मागणी समजून घेण्यावर आपला भर राहील, असे सांगत दिव्याने या अनुभवातून काय शिकायला मिळेल, हे स्पर्धेनंतरच स्पष्ट होईल, असे म्हटले. बंगळुरूला तिची ही पहिलीच खर्‍या अर्थाने भेट ठरणार आहे. मी आतापर्यंत केवळ बंगळुरू विमानतळावर आले आहे. शहरात येण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे, असे दिव्याने सांगितले. ग्लोबल चेस लीगच्या चौथ्या हंगामात सहा जागतिक फ्रँचायझींचे प्रतिनिधित्व करणारे 36 अव्वल बुद्धिबळपटू सहभागी होणार आहेत. मिश्र-सांघिक स्वरूपातील टेक महिंद्रा ग्लोबल चेस लीगचा चौथा हंगाम 5 ते 13 सप्टेंबर 2026 दरम्यान बंगळुरूतील द ललित अशोक येथे रंगणार आहे.

Related Articles