प्रलयंकारी ‘धक्का’ (अग्रलेख)   

भूकंप आणि पूर या नैसर्गिक घटना असल्या, तरी त्यामध्ये माणसाचा सहभाग आहे का हे तपासण्याची वेळ आल्याचे नेपाळमधील दुर्घटनेवरून जाणवते. विकास आणि पर्यावरण यातील संतुलन जपणे गरजेचे आहे.
 
नेपाळमध्ये आलेला पूर भयप्रद आहे. या देशातील तिबेटच्या सीमेलगतच्या भागात पुराने हाहाकार माजवला आहे. दीडशेपेक्षा जास्त जणांचे त्यात बळी गेले आणि शेकडो अजूनही बेपत्ता आहेत. बहुमजली इमारतीदेखील चिखलात बुडाल्या, रस्त्यावरील वाहने वाहून गेली. मृतांमध्ये नेपाळच्या लष्करातील सैनिक, पोलिस, सशस्त्र पोलिस दलाचे कर्मचारी यांची संख्या जास्त असल्याचे कळले आहे. अनेक परदेशी नागरिक मरण पावले किंवा बेपत्ता आहेत. भोते कोशी नदीच्या पुराचा जोर एवढा प्रचंड होता, की त्यात नुवाकोट भागातील किमान बारा जल विद्युत प्रकल्प वाहून गेले. रस्ते, पूल यांचे किती नुकसान झाले ते अजून स्पष्ट झालेले नाही. बर्फ आणि चिखल यामुळे मदत व शोध कार्यात अडथळे येत आहेत. हिमालयाच्या परिसरात गिर्यारोहणासाठी (ट्रेकिंग) आणि कैलास मानसरोवर यात्रेसाठी आलेल्या अनेक परदेशी नागरिकांचा या दुर्घटनेत बळी गेल्याची भीती आहे. अचानक एवढा मोठा पूर का आला याचे कारण अजून पूर्णपणे समजलेले नाही. भारतासह अनेक देशांचे शास्त्रज्ञ ते शोधत आहेत. बुधवारी सकाळी तिबेटमध्ये भूकंप झाला. त्याची तीव्रता 4.9 रिश्टर स्केल एवढी होती. त्यानंतर नदीस पूर आला. त्यामुळे या दोन घटनांमधील संबंध तपासला जात आहे. 
 
पर्यावरणाचा इशारा
 
राष्ट्रीय दूर संवेदन केंद्र (एनआरएससी) ही भारतीय अवकाश संशोधन संस्थेशी(इस्रो) निगडित असलेली संशोधन संस्था आहे. भारतीय व आंतरराष्ट्रीय उपग्रहांवरून मिळालेल्या माहितीच्या व दृश्यांच्या आधारे या संस्थेतील शास्त्रज्ञांनी पुराने झालेल्या नुकसानीच्या व्यापकतेचा आराखडा तयार केला आहे. पर्वतांच्या उंच भागातील खोलगट भागात बर्फ साठून तयार झालेल्या हिमनदीस ’सिर्क ग्लेशियर’ असे म्हटले जाते. भूकंपाच्या धक्क्यामुळे तिबेटमधील पर्वतांच्या उंच भागातील अशा हिमनदीस हादरा बसला आणि ती कोसळली. त्यातून बर्फ आणि दगडांचा ’हिमप्रपात’ बनला. हा बर्फ आणि दगड-मातीचा प्रपात दक्षिण  तिबेटमधील त्रिशुली नदीत कोसळला. त्याने काही काळ नदीचा प्रवाह अडला आणि नंतर लगेचच अत्यंत वेगाने ते पाणी वाहू लागले. अचानक आलेल्या त्या प्रवाहाने नेपाळमध्ये अकल्पित नुकसान केले. नेपाळच्या रासुवा भागात  जमिनीखाली दहा किलोमीटर हा भूकंप झाल्याचे भूगर्भांतर्गत घडामोडींवर लक्ष ठेवणार्‍या भारतीय संस्थेने सांगितले आहे. हिमालयातील हा भाग भूकंप प्रवण मानला जातो. बर्फ-दगड यांचा हिमप्रपात हेच या पुराचे कारण आहे काय, याचा शोध एक आंतरराष्ट्रीय संस्था आणि तिच्या नेपाळ व चीनमधील भागीदार संस्था घेत आहेत. गेल्या वर्षीही रासुवा भागातच मोठा पूर आला होता. नेपाळ-चीन सीमेवर अजूनही नद्यांचा प्रवाह अडवणारे घटक आहेत, त्यामुळे आणखी एक पूर येण्याची भीती या संस्थांनी व्यक्त केली आहे. भूकंप ही नैसर्गिक घटना आहे. अलीकडे दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला व कोलंबिया या देशांत मोठे भूकंप झाले. भूगर्भातील हालचालींमुळे संपूर्ण हिमालय पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. या प्रदेशात धरणे व वीज प्रकल्प उभारणे त्यामुळेच धोकादायक आहे. नेपाळमध्ये वीज निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. भारतही नेपाळकडून वीज विकत घेतो; मात्र अशा प्रकल्पांचा पर्यावरणावर होणारा परिणाम तपासणे आवश्यक ठरले आहे. भारत, चीन, नेपाळ आणि भूतान पर्यावरणीयदृष्ट्या एकमेकांना बांधले गेले आहेत, हे नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिसिर खनाल यांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे या देशांनी पर्यावरणाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे, ते विचारात घ्यावे लागेल. निसर्गावर मानवाचे नियंत्रण नसले तरी त्या-त्या भागातील परिसंस्थेची हानी होणार नाही, त्याचे जतन करणे या कडे लक्ष देणे मानवास भाग आहे हे या दुर्घटनेने दाखवून दिले आहे. नेपाळमधील पूर भारतात, बिहारमध्ये पूर्वी पोचला होता हे लक्षात घेणे आवश्यक आहे. हिमालयातील हिमनद्यांकडे दुर्लक्ष केल्यास काय होते याचा इशारा निसर्गाने दिला आहे.

Related Articles