वाचक लिहितात   

समाजमन बधीर झाले आहे का?
 
जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे दहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याच्या घटनेने पुन्हा एकदा समाजमन हादरले आहे. वारंवार घडणार्‍या लैंगिक अत्याचाराच्या भयंकर घटना पाहता समाजमन बधिरले आहे असेच उद्वेगाने आणि संतापाने म्हणावेसे वाटते. स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना पाहता खरेच स्त्री जात किती असुरक्षित आहे याचाच प्रत्यय येतो. जबाबदार पालकत्वाची तर गरज आहेच तथापि अपरिहार्यतेतून लहान बाळाला घरात एकटे ठेवणे खरेच चूक आहे का? लहान बाळे, स्त्रिया घरादारात रस्त्यावर सुरक्षित का नसाव्यात? एवढी सुरक्षितता त्यांना का बहाल असू नये. अशी सुरक्षितता बहाल करणारा असा समाज का असू नये? आजूबाजूचे, शेजारीपाजारी, रस्त्यावरचे येणारे जाणारे अशी भयंकर घटना घडत असताना काय करीत असतात? समाजाचे जबाबदार घटक म्हणून समाजाचे आपण काही देणे लागतो की नाही? ’मला काय त्याचे!’ अशी बेफिकीर वृत्तीच घात करणारी म्हणूनच तितकीच संताप आणणारी!
 
श्रीकांत जाधव, अतीत (जि.सातारा) 
 
अमेरिकेला भारतीय नकोत?
 
पाच हजार भारतीयांना ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसांत परत पाठवले ही बातमी खेदजनक असून अमेरिकेच्या अध्यक्षांना आता भारतीय त्यांच्या देशात नकोसे झाले आहेत हे ते पदोपदी जाणवून देत आहेत. आतातरी भारतीयांचे अमेरिकेमध्ये आकर्षण कमी होईल का? आज आपला देश सर्व आघाडीवर प्रगती करत असताना विद्यार्थी व पालकांना असणारी अमेरिकेची ओढ अगम्य अशी आहे. त्या देशात डिलिव्हरी बॉयचे काम करायला तयार असणारे भारतीय तरूण इथे मात्र पांढरपेशी नोकरीचीच अपेक्षा ठेवतात हे अनाकलनीय आहे. अमेरिकेतील श्रमप्रतिष्ठा भारतात का लागू होत नाही? जर अमेरिकेच्या अध्यक्षांना स्थलांतरितांना बाहेर काढायचे आहे, तर भारतीयांनी स्वतःहून तिथून निघून येऊन स्वाभिमान का दाखवू नये? निव्वळ भौतिक प्रगतीची फळे चाखण्यासाठी परदेशी राहून अपमान का सहन करायचा? 
 
माया भाटकर, बाणेर, पुणे
 
जवानांचा आदर हवाच
 
लडाखमधील मीना मार्ग येथे सुरक्षा दलाच्या जवानांनी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना अडविल्यानंतर एका महिलेने चुकीचा व्हिडिओ तयार करून जवानांचा अपमान केलेला आहे. तिचे हे सगळे वर्तन निश्‍चितच चुकीचे आहे. जेन झीच्या नावाखाली भारतीय जवानांवर तिने जे आरोप केले त्यांचा अपमान केला आणि तो व्हिडिओ समाज माध्यमाांवर टाकला त्याविषयी संपूर्ण देशात त्या महिलेविषयी संतापाची लाट उसळली आहे. आपले घरदार सोडून आपल्या प्राणांची बाजी लावत अहोरात्र सीमेवर पहारा देत शत्रूंच्या गोळ्या अंगावर घेत हे जवान देशातील नागरिकांचे रक्षण करण्याचे पवित्र काम करत आहेत. अशा वीर जवानांचा अपमान करणे व त्यांना जेन झी नावाखाली धमकी देणे हे योग्य नाही.
 
विजय आकुर्डेकर, पुणे
 
कोल्हापूरची कामगिरी
 
जिल्हा विकासाच्या कामगिरीत कोल्हापूरने पुन्हा एकदा राज्यात आपला ठसा उमटविला आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येत असलेल्या महास्ट्रॉईड प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्ह्याने शंभर टक्के गुण मिळवत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकवला. त्यामुळे विकासाच्या कामगिरीत आपले स्थान अधिक बळकट करुन राज्यात पुन्हा एकदा कोल्हापूर लई भारी असल्याचे अधोरेखित केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर जिल्ह्याला 16 कोटी रुपयांचा प्रोत्साहन निधी मिळणार आहे. 
राजू जाधव, मांगूर जि. बेळगांव 
 
आता साखरही झाली कडू!

Related Articles