जपान सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले सर्व विद्यार्थी टिमविचेच   

पुणे : टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील (टिमवि) जपानी भाषा विभागाच्या 6 विद्यार्थ्यांची जपान सरकारच्या अत्यंत प्रतिष्ठित  ‘मेक्स्ट’ (शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या) या शिष्यवृत्तीसाठी संपूर्ण भारतातून निवड झाली आहे. उच्च शिक्षणासाठी व जपानी भाषेच्या सखोल अभ्यासासाठी हे विद्यार्थी एका वर्षासाठी जपानला रवाना होणार आहेत.
 
जपान सरकारतर्फे दरवर्षी दिल्या जाणार्‍या या उच्चस्तरीय शिष्यवृत्तीसाठी देशभरातून कठीण निवड प्रक्रिया पार पडते. यंदा, टिमविच्या सहा विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर यात बाजी मारली. ही शिष्यवृत्ती मिळवलेले विद्यार्थी जपानमधील नामांकित विद्यापीठांमध्ये पुढील 1 वर्षासाठी जपानी भाषा, संस्कृती आणि साहित्याचा सखोल अभ्यास करणार आहेत. या कालावधीत विद्यार्थ्यांचा सर्व शैक्षणिक तसेच निवास आणि प्रवास खर्च जपान सरकारतर्फे केला जाणार आहे. 
 
या विद्यार्थ्यांना उमा गोखले, बकुल वैद्य, वृषाली पुंडे व मदुरा मांडके या प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल बोलताना विद्यापीठाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, टिमविचा जपानी भाषा विभाग अनेक वर्षांपासून दर्जेदार शिक्षणासाठी ओळखला जातो. मागील वर्षी विद्यापीठाच्या 8 विद्यार्थ्यांची, तर त्याआधी 6 विद्यार्थ्यांची या प्रतिष्ठित शिष्यवृत्तीसाठी निवड झाली होती. यंदा 6 विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली असून विद्यापीठासाठी हा अभिमानास्पद क्षण आहे.या यशाबद्दल विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक, कुलसचिव डॉ. सुवर्णा साठे, विभाग प्रमुख डॉ. मंजिरी भालेराव तसेच जपानी भाषा विभागातील समन्वयक व प्राध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
 
निवड झालेले विद्यार्थी आणि त्यांना मिळालेली जपानी विद्यापीठे :
 
० श्रीजा कोलते : शिनशु विद्यापीठ         ० दीपाश्री हिवरे : मिए विद्यापीठ  
० ज्यूंतोसंग आएर : साईतामा विद्यापीठ ० मयूरेश पायगुडे : तोयामा विद्यापीठ  
० अभिन्या दांडेकर : नागोया विद्यापीठ ० दीपश्री देशमुख : हीरोसाकी विद्यापीठ  

Related Articles