हायपॉवर टॉवरवर वृद्धाची तीन तास थरारक झुंज   

तरुणांच्या धाडसाने सुखरूप खाली 

सोलापूर,(प्रतिनिधी) : मुरारजीपेठ परिसरातील महापारेषणच्या १३२ केव्ही नविवेस उपकेंद्रातून बाहेर पडलेल्या हायपॉवर विद्युत टॉवरवर अंदाजे ६५ ते ७० वर्षांचा वृद्ध गुरुवारी सकाळी चढल्याने एकच खळबळ उडाली. तब्बल तीन तासांहून अधिक काळ चाललेल्या या थरारक बचावकार्यात पोलिस, अग्निशमन दल आणि नागरिकांची अक्षरशः दमछाक झाली.अखेर काही धाडसी तरुणांनी जीवाची पर्वा न करता टॉवरवर चढून वृद्धाला पकडले आणि सुखरूप खाली आणले.
 
सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास एक वृद्ध व्यक्ती विद्युत टॉवरवर चढल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. तरुणांनी तातडीने शेजारील महापारेषण उपकेंद्रातील अधिकार्‍यांना याची माहिती दिली. व्यक्ती टॉवरवर असल्याची खात्री झाल्यानंतर संबंधित विद्युत वाहिनीचा पुरवठा तातडीने बंद करण्यात आला.माहिती मिळताच फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी टॉवरवरील वृद्धाला खाली येण्याची विनंती सुरू केली. काही वेळात अग्निशमन दलाचे पथकही दाखल झाले. मात्र, वृद्ध कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. तो कधी टॉवरच्या एका बाजूला, कधी दुसर्‍या बाजूला, हालचाल करत होता.
 
या घटनेची माहिती परिसरात पसरताच टॉवरच्या आजूबाजूला तरुणांची मोठी गर्दी झाली. गर्दीचा आवाज आणि हुल्लडबाजीमुळे टॉवरवर चढलेला वृद्ध आणखीनच घाबरत असल्याचे दिसून आले.दरम्यान जुनी पोलीस लाईन ते शेटे वस्ती या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. रस्त्यावर नागरिकांची गर्दी, बघ्यांची वाहने आणि बचावकार्यासाठी आलेल्या वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. 
 
काही तरुणांनी धाडस करून टॉवरवर चढून वृद्धाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, वृद्धाने त्यांनाही ढकलण्याचा प्रयत्न केल्याने तरुणांना खाली उतरावे लागले. त्यानंतर अग्निशमन दलाने मोठी शिडी लावली. मात्र शिडी पाहताच वृद्ध आणखी वरच्या टोकाकडे गेला. त्यामुळे उपस्थित पोलिस आणि अग्निशमन कर्मचार्‍यांची चिंता वाढली. अग्निशमन विभागाचे प्रमुख राकेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्‍यांनी खाली जाळी पकडून ठेवली. वृद्धाने उडी मारली किंवा तोल गेल्यास त्याला जाळीत पकडता यावे, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली.
 
पाण्याची बाटली ठरली बचावाची कळी
 
टॉवरवर तीन तासांहून अधिक काळ राहिल्याने वृद्धाला तहान लागली. त्याने वरून हातवारे करून पाण्याची मागणी केली. पोलिसांनी हीच संधी साधत त्याला पाण्याची बाटली आणि पैसे दाखवत खाली येण्यास प्रवृत्त केले. पाणी घेण्यासाठी वृद्ध टॉवरच्या टोकावरून शिडीच्या दिशेने खाली येऊ लागला. याच क्षणी काही धाडसी तरुण एका बाजूने टॉवरवर चढले. वृद्धाने त्यांना झटकण्याचा व ढकलण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी दुसर्‍या बाजूने एका तरुणाने त्याला घट्ट पकडले. त्यानंतर इतर तरुणांनीही त्याला घेरून पकडले. दोरीच्या साहाय्याने त्याला सुरक्षित करण्यात आले आणि अग्निशमन दलाने तयार ठेवलेल्या जाळीजवळ त्याला अलगद खाली आणण्यात आले. खाली आल्यानंतर वृद्धाने पाणी मागितले. पोलिसांनी त्याला पाणी दिले आणि पुढील वैद्यकीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात नेले. या वृद्धाचे नाव, तो नेमका कुठून आला आणि टॉवरवर चढण्यामागील कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 
 
या बचावकार्यात समीर सय्यद, संतोष कांबळे, सुलेमान शेख, सिद्धेश्वर कान्हूरे, स्वप्नील कांबळे आणि विरेश या तरुणांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता टॉवरवर चढून वृद्धाला घेरले आणि सुरक्षित खाली आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
 

 

Related Articles