कुर्डुवाडीतील बालोद्यानाची दुरवस्था   

बालगोपाळांचे ’बालपण’ हिरावले

कुर्डुवाडी, (प्रतिनिधी) : एकेकाळी लहान मुलांच्या किलबिलाटाने आणि आनंदी हास्याने फुलून जाणारे कुर्डुवाडीतील ऐतिहासिक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बालोद्यान आज प्रशासकीय दुर्लक्ष आणि नियोजनाअभावी पूर्णपणे भकास झाले आहे. शहरात लहान मुलांसाठी एकही सुरक्षित खेळणी शिल्लक नसून, नगरपालिकेच्या अनास्थेमुळे बालगोपाळांचा हक्काचा विरंगुळा पार हिरावला गेला आहे.
 
कुर्डुवाडी नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. कुंतल शहा यांच्या काळात, साधारण 1977 मध्ये या बालोद्यानाची उभारणी करण्यात आली होती. मात्र आज या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. एका बाजूची भिंत व ग्रील गायब असून परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. पाणीपुरवठा विभागाची जीर्ण खोली आणि जुनी टाकी आजही कशीबशी तग धरुन उभी आहे. 
 
विशेष म्हणजे, जानेवारी 2021 मध्ये उद्यानाच्या कायापालटासाठी 1 कोटी रुपयांचे टेंडर निघाले होते. यामध्येउद्यानाची संरक्षण भिंत दुरुस्त करणे व पेव्हिंग ब्लॉक बसवणे. सौंदर्यात भर घालणारी झाडे लावणे आणि संदेश भिंती तयार करणे. अत्याधुनिक शौचालय, वॉचमन रूम उभारणे आणि सर्व नवी खेळणी बसवणे. आदी कामे होती, मात्र प्रत्यक्षात नूतनीकरणाच्या नावाखाली फक्त तोडफोड झाली. जुनी खेळणी काढून टाकली गेली, पण नवीन खेळणी आजही बसवण्यात आलेली नाहीत. हा निधी नक्की कुठे गेला, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.दरम्यान, टेंभुर्णी रस्त्यावरील साई कॉलनी आणि माढा रोडवरील शिवसाई कॉलनी येथील मोकळ्या जागेत काही खेळणी बसवण्यात आली होती. परंतु देखभालीअभावी तीही आता मोडकळीस आली आहेत. शहरात मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य पालकांसाठी पाल्यांना सायंकाळी खेळायला नेण्यासाठी एकही योग्य जागा उरलेली नाही.
 
’’गेली कित्येक वर्षे कुर्डुवाडी शहरातील अहिल्यादेवी होळकर बालोद्यान मध्ये कोणतीही खेळणी नाहीत. सर्वत्र अस्वच्छता आहे. लहान मुलांना कुठे फिरायला घेऊन जायचे हा मोठा प्रश्‍न पालकांना पडतो. निधी मंजूर असताना देखील कोणतीही सुधारणा केली जात नाही. कुर्डुवाडी शहरातील बालोद्यानसाठी आरक्षित असलेल्या जागेवर बालोद्यान विकसित करून ते बाळगोपाळांना खेळण्यास उपलब्ध करून द्यावे. 
 
- हरीश भराटे ( सामाजिक कार्यकर्ते, कुर्डुवाडी)

Related Articles