लालबागच्या राजानंतर आणखी एका मंडळाचा अदानी समूहाबरोबर करार   

मनसेकडून टीका 

मुंबई, (प्रतिनिधी) : लालबागच्या राजा मंडळाने मागील वर्षी सल्लागारपदी अनंत अंबानी यांची नियुक्ती केली आहे. चिंचपोकळीच्या गणेशोत्सव मंडळाने यंदा अदानी समूहासोबत करार केला आहे. गणेशोत्सव हा आमचा मराठी मातीचा सण होता. आता ‘कॉर्पोरेट वॉर’चा भाग ही मंडळे होत असतील तर दुर्देव आहे. गणपतीत आता आम्हाला काय गरबा दिसणार का? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. लालबागच्या राजा मंडळाच्या सुधीर साळवी यांना इतिहास माफ करणार नाही, असेही देशपांडे म्हणाले.
 
गणेशोत्सव साजरा करायला पैसे लागतात, हे मला मान्य आहे. पण, असे किती पैसे लागतात. लालबागच्या राजाकडे तर लोकांकडून कोट्यवधी जमा होतात. ते पुरेसे नाहीत का?  असा सवाल केला. मागील वर्षी रिलायन्सच्या जाहिराती लालबागभर लागल्या होत्या. आता अदानीच्या लागतील. ही मंडळे आता ‘कॉर्पोरेट वॉर’चा भाग होणार असतील तर दुर्देव आहे. असेच चालू राहिले तर उद्या जेएसडब्ल्यू येईल, गोदरेज येईल असेही देशपांडे म्हणाले.मागील वर्षी ही सुरूवात लालबागच्या राजा मंडळाने केली. अनंत अंबानी यांना त्यांनी सल्लागार म्हणून नेमले. मंडळाचे पदाधिकारी साळवी माझे चांगले मित्र आहेत. पण, सुधीर साळवी यांना इतिहास माफ करणार नाही, असेही देशपांडे म्हणाले.

Related Articles