‘डिजिटल अरेस्ट’च्या भूलथापांना बळी पडू नका; 1930 वर फोन करा   

मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई, (प्रतिनिधी) : पोलिस, सीबीआय, न्यायाधीश किंवा अन्य सरकारी यंत्रणांच्या नावाने धमकावून नागरिकांना ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात ओढण्याचे प्रकार वाढत आहेत. अशा सायबर गुन्हेगारांच्या धमक्यांना आणि दबावाला नागरिकांनी घाबरू नये. सायबर फसवणूक लक्षात येताच वेळ न दवडता 1930 या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र सायबरच्या वतीने आयोजित कार्यक्रमात फडणवीस यांच्या हस्ते ‘डिजिटल अरेस्ट’ या सायबर जनजागृती लघुपटाचे आणि ‘1930 महाराष्ट्र सायबर अँथम’चे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 
 
यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पोलिस महासंचालक सदानंद दाते, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, पोलिस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलिस महासंचालक (सायबर) संजय शिंत्रे आदी उपस्थित होते. सायबर फसवणुकीनंतरचा ‘गोल्डन अवर’ अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात तक्रार दाखल झाल्यास फसवणुकीची रक्कम रोखण्याची किंवा परत मिळविण्याची शक्यता अधिक असते. मात्र, तक्रार करण्यास तीन ते पंधरा दिवसांचा विलंब झाल्यास पैसे अनेक खात्यांमध्ये फिरविले जातात आणि त्यांची रिकव्हरी करणे अत्यंत कठीण होते, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तातडीने 1930 वर संपर्क साधण्याचे त्यांनी सांगितले.
 
मोबाइल, ऑनलाइन व्यवहार, पेमेंट गेटवे आणि डिजिटल माध्यमे ही आजच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहेत. तंत्रज्ञानामुळे व्यवहार सुलभ झाले असले तरी त्याचवेळी सायबर गुन्ह्यांचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सायबर गुन्हेगारांचा मुकाबला करण्याबरोबरच नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे गरजेचे आहे. ‘डिजिटल अरेस्ट’ हा 42 मिनिटांचा जनजागृती लघुपट, तसेच विविध क्लिप्स आणि रील्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्यापक अभियान राबवून हा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

खाकी वर्दी पाहून घाबरू नका

पार्सलमध्ये अमलीपदार्थ सापडल्याचे सांगणे, ओटीपी मिळविणे, बनावट फोन कॉल करणे, पोलिस अथवा सीबीआयच्या नावाने धमकावणे, न्यायालयीन कारवाईची भीती दाखवणे अशा विविध क्लृप्त्या सायबर गुन्हेगारांकडून वापरल्या जात आहेत. व्हिडीओ कॉलवर खाकी वर्दीतील व्यक्ती, पोलिस अधिकारी किंवा न्यायाधीशाचे रूप दाखवून नागरिकांवर मानसिक दबाव आणला जातो. घाबरलेल्या नागरिकांकडून पैसे उकळले जातात. त्यामुळे कोणत्याही दबावाला किंवा भीतीला बळी पडू नका, असे फडणवीस यांनी सांगितले.

’एआय’मुळे नवे आव्हान

आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (एआय) व्हॉईस क्लोनिंग, डीपफेक तसेच बनावट ऑडिओ आणि व्हिडीओ तयार करण्याचे नवे आव्हान निर्माण झाले आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सायबरकडून सुरू असलेले काम प्रशंसनीय असून, सर्वांच्या सहकार्याने व्यापक सायबर जनजागृती मोहीम यशस्वी होईल, असा विश्‍वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

Related Articles