तिबेटमध्ये अडकलेले चार पुणेकर सुखरूप   

नेपाळमधील महापुरामुळे कैलास मानसरोवर मार्ग बंद

पुणे : नेपाळ आणि तिबेट सीमावर्ती भागात आलेल्या भीषण महापुरामुळे कैलास मानसरोवर यात्रेचा महत्त्वाचा मार्ग बंद झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे पुण्यातील चार यात्रेकरू तिबेटमधील जिलोंग शहरात अडकले आहेत. चारही जण सुखरूप असून, त्यापैकी दोन महिला यात्रेकरूंना उंचीजन्य आजाराचा त्रास झाल्याने तातडीच्या वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.स्मिता पवार, योगिनी पाटील, दिनेश भोसले आणि पूजा भोसले अशी या  यात्रेकरूंची नावे आहेत. ते कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात असताना नेपाळ-तिबेट सीमावर्ती भागात अचानक आलेल्या महापुरामुळे त्यांचा पुढील प्रवास थांबला आहे.
 
मानसरोवर परिसरात असताना स्मिता पवार आणि योगिनी पाटील यांना तीव्र हायपॉक्सिया अर्थात उंच प्रदेशात ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे होणारा त्रास झाला. दोघींनाही ऑक्सिजनचा सातत्याने पुरवठा करत कमी उंचीवर असलेल्या जिलोंग शहरात आणण्यात आले. त्या सुखरूप असल्या तरी त्यांना पुढील उपचारांसाठी सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा वैद्यकीय सुविधा असलेल्या रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असल्याचे त्यांच्या सहप्रवाशांनी सांगितले आहे.
 
यात्रेकरूंच्या नातेवाइकांनी भारत सरकार, भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि संबंधित भारतीय दूतावासाकडे तातडीच्या मदतीची मागणी केली आहे. चीन आणि नेपाळमधील अधिकार्‍यांशी समन्वय साधून चारही पुणेकर यात्रेकरूंना हेलिकॉप्टर किंवा अन्य हवाई मार्गाने जिलोंगमधून काठमांडूला हलवावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

Related Articles