विद्यार्थ्यांच्या पोषणाशी तडजोड नको   

धान्याची गुणवत्ता तपासून घ्या; शाळांना सूचना

पुणे : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित, पौष्टिक आणि संतुलित आहार मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेने शाळांना सूचना दिल्या आहेत. शाळांना मिळणारे तांदूळ आणि इतर धान्य प्रत्यक्ष वजन करून तसेच त्याची गुणवत्ता, उत्पादन तारीख व वापरण्याची मुदत तपासल्या नंतरच स्वीकारावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. शाळांना पुरवठा होणार्‍या तांदूळ आणि धान्याचे वजन काटेकोरपणे करावे. गुणवत्ता, आवश्यक नोंदी, उत्पादन तारीख आणि वापरण्याची अंतिम मुदत तपासल्यानंतरच तो स्वीकारावा, असे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले आहे. भारतीय अन्न महामंडळाकडून मिळणार्‍या तांदळाच्या पोत्यांवरील उत्पादन तारीख आणि वापरण्याची मुदत पाहणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
 
अनावश्यक धान्यसाठ्याला बसणार लगाम
 
आपत्कालीन परिस्थिती वगळता शाळांमध्ये तांदूळ किंवा इतर धान्याचा अनावश्यक आणि अतिरिक्त साठा ठेवू नये, अशी सक्त सूचना देण्यात आली आहे. शाळा व्यवस्थापन समिती, आहार शिजविणारी यंत्रणा अथवा बचतगट, मुख्याध्यापक आणि शिक्षकांना आवश्यकतेनुसार मालाचे प्रत्यक्ष वजन करून नोंद ठेवावी लागणार आहे.
 
बारामती, दौंड, शिरूरमधील नमुने प्रयोगशाळेत
 
शिक्षण संचालनालयाच्या सूचनेनुसार पहिल्या टप्प्यात बारामती, दौंड आणि शिरूर या तीन तालुक्यांतील शाळांमधून धान्याचे नमुनेे गोळा करण्यात येणार आहेत. हे नमुने शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातील. तपासणीत विद्यार्थ्यांना वितरित होणारा तांदूळ निर्धारित गुणवत्तेच्या निकषांनुसार आहे की नाही, याची खात्री केली जाणार आहे. अहवालानुसार आवश्यक पुढील कार्यवाही केली जाईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने धान्याच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
 
अन्न सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण
 
अन्न सुरक्षा व मानकांचे प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांसाठी तालुकास्तरावर विशेष प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. राज्य अन्न सुरक्षा आयुक्त आणि शिक्षण संचालक यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या योजनेची अंमलबजावणी अधिक काटेकोर करण्यावर भर देण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे कार्यालयातील तालुकानिहाय मार्गदर्शक अधिकारीही अन्नाची स्वच्छता, सुरक्षितता आणि निर्धारित मानकांबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत.
 
सर्व शाळांनी अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ, पौष्टिक आणि गुणवत्तापूर्ण आहार उपलब्ध करून द्यावा. शाळांमधील पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. 
- विवेक वळसे पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, सभापती शिक्षण समिती 

Related Articles