जेन-झी सोबतच्या संवादासाठी निवडणूक आयोगाचाही पुढाकार   

नवी दिल्‍ली : निवडणूक आयोगाने तरुण पिढी सोबत संवाद साधण्यासाठी आता पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत जेन अल्फा आणि झी यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. 
 
लोकसभेची निवडणूक 2029 मध्ये होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर तरुणांची नावे मतदार यादीत असावीत, यासाठी जागृती करण्याबरोबरच त्यांना निवडणुकीबाबतचे ज्ञान दिले जाणार आहे. त्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती आणि ज्ञान व्हावे, या उपक्रमाचा हेतु आहे. उपक्रमाअंतर्गत 4 हजार 123 विधानसभा मतदारसंघातील  9 ते 12 इयत्तेतील विद्यार्थी, महाविद्यालय आणि विद्यापीठातील विद्यार्थ्याशी संवाद साधला जाणार आहे. 18 ते 26 वयोगटातील 14.78 कोटी जण असून त्यामध्ये 7.98 कोटी पुरुष आणि 6.79 कोटी महिला आहेत. नऊ हजार तृतीयपंथी आहेत.  निवडणूक आयोगाची 50 हजार  ’निवडणूक साक्षरता मंडळे’ स्थापन करण्याची योजना आहे. त्येक विधानसभा मतदारसंघात अशी दहा  मंडळे असतील. यासाठी 15 लाख शाळांमधील इयत्ता 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधला जाईल. तसेच, 70 हजार महाविद्यालये आणि 1 हजार 400 विद्यापीठांपर्यंतही पोहोचले जाईल. 
 
विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्ये, निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाची भूमिका व कार्यपद्धती यांची ओळख करून देण्यासाठी ’सिस्टिमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन’ कार्यक्रमांतर्गत 2018 मध्ये ही निवडणूक साक्षरता मंडळे स्थापन करण्यात आली होती. दरम्यान, संवाद-व्यवस्था वेगाने बदलती आहे.  डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरील  अवलंबित्व वाढत चालले आहे. तरुण मतदार तसेच तळागाळातील नागरिकांशी सातत्यपूर्ण, सुनियोजित व थेट संवाद साधण्याची गरज लक्षात घेता, ’ईएलसी 2.0’  अंतर्गत या मंडळांची फेररचना एका डिजिटल-सक्षम, सुनियोजित आणि सतत सक्रिय सहभाग असलेल्या आराखड्याच्या स्वरूपात केली जात आहे.
 

Related Articles