रशियाच्या ऑनलाइन ’वाइल्डबेरीज’ कंपनीचे गोदाम ड्रोन हल्ल्यात नष्ट   

युक्रेनच्या जोरदार हल्ल्यानंतर आगीचा भडका

मॉस्को : रशियाची ऑनलाइन किरकोळ व्यापार आघाडीवर असलेल्या एका कंपनीचे गोदाम युक्रेनने ड्रोनचा मारा करुन उद्ध्वस्त केले. त्यासाठी लांब पल्ल्यांचा ड्रोनचा वापर करण्यात आला. ड्रोन आदळल्यानंतर परिसरात आगीचे लोळ उसळले होते. या हल्ल्यामुळे रशियाचा आर्थिक कणा मोडण्याच्या दिशेने युक्रेनने पाऊल टाकल्याचे मानले जात आहे. ’वाइल्डबेरीज’ कंपनीचे ते गोदाम असून रशियाच्या ऑनलाइन किरकोळ व्यापारात कंपनी अग्रेसर आहे. त्या गोदामावर युक्रेनचे ड्रोन मंगळवारी रात्री एका पाठोपाठ आदळले होते. यापूर्वी रशियाच्या खनिज तेल विहिरी, शुद्धीकरण कारखान्यांना युक्रेनेने लक्ष्य केले होते. आता ऑनलाइन प्लॅटफॉर्म असलेल्या ठिकाणांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. 
 
युक्रेनियन सैन्याने यापूर्वी 18 जुलै रोजी मॉस्कोच्या आग्‍नेय आणि युक्रेनच्या सीमेपासून काहीशे किलोमीटर अंतरावर असलेल्या तांबोव्ह प्रदेशातील गोदामावर हल्‍ला केला होता. तेव्हा सात जण ठार झाले होते. यानंतर हवाई  हल्ल्यांच्या मालिकेला सुरुवात झाली होती.  ’वाइल्डबेरीज’  या ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनीला वारंवार जोरदार फटके दिले आहेत. या कंपनीचा आकार आणि व्यावसायिक महत्त्व पाहता तिची तुलना ’अ‍ॅमेझॉन’शी केली जाते. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केले होते. त्यानंतर युक्रेनने  अत्याधुनिक ड्रोनची निर्मिती केली. त्याची मारक क्षमता मोठी आहे. त्या ड्रोनचा वापर करुन रशियाभर पसरलेल्या ’वाइल्डबेरीज’ कंपनीच्या अनेक केंद्रांवर हल्‍ले करणे शक्य झाले आहे. कीव्हमधील अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, या कंपनीद्वारे विकल्या जाणार्‍या वस्तूंमध्ये रशियन लष्कराकडून वापरले जाणारे साहित्य आणि तांत्रिक घटकांचा समावेश आहे. हल्ल्यामुळे  रशियन नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. तसेच रशियाच्या अर्थव्यवस्थेलाही फटका बसला आहे; हल्‍ले करुन युक्रेन आपली युद्धविषयक उद्दिष्टे साध्य करत आहेत.

Related Articles