सीमाप्रश्‍नावर राजकीय तोडगा हवा   

भारत आणि चीनमध्ये मतैक्य; डोवाल आणि वांग यांच्यात चर्चा

बीजिंग : सीमाप्रश्‍न सोडविण्यासाठी राजकीय तोडगा हवा आहे.  यावर भारत आणि चीनमध्ये मतैक्य झाले. दोन्ही देशांतील सीमावादावर प्रतिनिधी पातळीवरील 25 वी बैठक पार पडली. राष्ट्रीय सुरक्षा सल्‍लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता नांदावी, संघषर्ं उफाळून येता कामा नये आणि द्विपक्षीय संबंधांवर विस्तृत चर्चा केली.सीमाप्रश्‍नावर पुढेही चर्चा सुरु ठेवणे, त्याबाबत एकमेकांना आपले दृष्टीकोन समजावून सांगणे. तसेच या विषयावर संपूर्णपणे राजकीय तोडगा काढणे यावर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींचा भर होता. त्यामळे एकंदरीत दीर्घकालीन हितांचे रक्षण होण्यास चालना मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी प्रकट केला. 
 
दरम्यान, अजित डोवाल यांचे सोमवारी चीनच्या दोन दिवसांच्या दौर्‍यासाठी चीनची राजधानी बीजिंगमध्ये आगमन झाले होते. 2020 मध्ये गलवान खोर्‍यात दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये संघर्ष उफाळून आला होता. त्यानंतर सीमाप्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी दोन्ही देशांनी विशेष प्रतिनिधी समिती नेमली होती. त्या समितीची चर्चेची 25 वी फेरी पार पडली. त्या फेरीत अजित डोवाल यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. भारतात पुढील महिन्यात ब्रिक्स परिषद होत आहे. त्या परिषदेत चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग यांनी सहभागी व्हावे, असे प्रयत्न सुरु आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर डोवाल यांच्या चीन दौर्‍याला महत्त्व प्राप्‍त झाले होेते. विशेष प्रतिनिधी स्तरीय बैठकीत डोवाल आणि वांग यांनी चर्चा केली. दरम्यान, चीनच्या सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अरुणाचल प्रदेशातील सुबांश्री परिसरात आक्रमक पावले उचलली असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्या पार्श्‍वभूमीवर बैठकीला महत्व प्राप्‍त झाले होते. बैठकीतील  भाषणात डोवाल म्हणाले की, सीमावर्ती भागात दोन्ही बाजूंनी शांतता आणि सुव्यवस्था राखल्यामुळेच संबंधांमध्ये सामान्य स्थिती निर्माण झाली आहे. मला खूप आनंद आहे की आपण चर्चेच्या 25 व्या फेरीसाठी येथे जमलो आहोत; विशेषतः लवकरच होणार्‍या ब्रिक्स  शिखर परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर ही चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष झी जिनपिंग यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ही बैठक घेत आहोत. या नेत्यांनी कझान आणि तियानजिन येथे आमच्या संबंधांना स्पष्ट आणि सकारात्मक दिशा दिली आहे, असे डोवाल म्हणाले. त्यांनी 2024 मध्ये रशियातील ब्रिक्स शिखर परिषद आणि गेल्या वर्षी चीनमधील शांघाय शिखर परिषदेदरम्यान मोदी आणि जिनपिंग यांच्या भेटींचा संदर्भ दिला. 
 
दोन्ही देशांतील नागरिकांचे संबंध निर्माण होत आहेत, नाथूला मार्गे कैलास मानसरोवर यात्रेचे यशस्वी आयोजन आणि तिन्ही खिंडींमधून पारंपरिक सीमा व्यापार पुन्हा सुरू केल्यामुळे आमच्या नागरिकांना ,विशेषतः सीमावर्ती भागातील रहिवाशांना, प्रत्यक्ष लाभ झाले आहेत.
 
- अजित डोवाल, राष्ट्रीय सल्‍लागार, भारत
 
दोन्ही देशांमधील संबंधांना नवी चालना देण्याची गरज आहे. सीमाविषयक प्रश्‍न योग्यरित्या हाताळण्यासाठी, तसेच सीमावर्ती भागात शांतता व सुव्यवस्था राखण्यासोबतच द्विपक्षीय संबंधांना नवी गती द्यावी, समान हिताच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा व विचारांची देवाणघेवाण सुरू ठेवण्यास मी उत्सुक आहे. दोन्ही बाजूंनी राजनैतिक आणि लष्करी माध्यमांतून नियमित संवाद कायम ठेवल आहे.
 
- वांग यी, परराष्ट्र मंत्री. चीन
 

Related Articles