उत्तरपत्रिकांच्या प्रती विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार   

व्यवस्थापन परिषदेत प्रस्ताव मंजूर
 
पुणे : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित, सुरक्षितता, सुविधा आणि कौशल्यविकास यांना प्राधान्य देत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विविध महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मंजुरी दिली. यामध्ये विद्यार्थिनींसाठी राबविण्यात येणार्‍या ‘निर्भय कन्या अभियाना’साठी 39 लाख 20 हजार रुपयांचा निधी, परीक्षांच्या उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती उपलब्ध करून देणे, पुनर्मूल्यांकनासाठी आवश्यक सुविधांना मंजुरी, पदवी प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांच्या घरच्या पत्त्यावर टपालाद्वारे पाठविणे तसेच सेमिकंडक्टर व अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील कौशल्यविकासासाठी ‘न्यू एज एज्युकेशन अँड स्किल फाउंडेशन’सोबत सामंजस्य करार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि परिसंस्थांमध्ये विद्यार्थिनींसाठी राबविण्यात येणार्‍या ‘निर्भय कन्या अभियाना’अंतर्गत प्रत्यक्ष आणि ऑनलाइन व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक व्याख्यानासाठी सहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असून, 167 महाविद्यालयांच्या प्रस्तावानुसार एकूण 39 लाख 20 हजार रुपयांच्या खर्चास प्रशासकीय आणि आर्थिक मान्यता देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्‍वास, सुरक्षिततेविषयी जागरूकता आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळणार आहे.
 
ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026 ते मार्च-एप्रिल 2029 या कालावधीतील परीक्षांच्या उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच पुनर्मूल्यांकन प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या ‘मास्किंग’ सेवेच्या प्रत्यक्ष खर्चासही मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षा आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.सेमिकंडक्टर उत्पादन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने ‘न्यू एज एज्युकेशन अँड स्किल फाउंडेशन’ सोबत सामंजस्य करार करण्यासही मान्यता देण्यात आली. या कराराच्या माध्यमातून विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी प्रगत प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे तसेच अत्याधुनिक कौशल्यविकास केंद्रे उभारण्याच्या दिशेने विद्यापीठ पुढाकार घेणार आहे.
 
पदवी प्रमाणपत्रे घरपोच
 
127 व्या पदवी प्रदान समारंभातील पदवी प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांच्या घरच्या पत्त्यावर टपालाद्वारे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रक्रियेसाठी अंदाजे 65 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचण्यासोबतच प्रमाणपत्र घेण्यासाठी विद्यापीठात येण्याचा त्रास कमी होणार आहे.

Related Articles