विकसित शहरांच्या यादीत पुणे का नाही ?   

समस्याग्रस्त पुणे , सुरेश कोडीतकर 

सिटीज ऑन दी राईज म्हणजे, उगवत्या शहरांच्या (विकसित शहरांच्या) सन 2026 च्या यादीत आपले पुणे शहर नाही. इतर महानगरे जसे की मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळूरू, नोइडा, हैदराबाद, भोपाळ, अहमदाबाद, तिरुअनंतपुरम, पटना, जयपूर यांचासुध्दा  सिटीज ऑन दी राईज म्हणजे उगवत्या शहरांच्या 2026 च्या  यादीत समावेश नाही. गर्दी, वाहनांची दाटी, ढासळते पर्यावरण, सार्वजनिक सेवा सुविधांचा अभाव, रोजगाराच्या आणि उत्पन्नाच्या कमी संधी, प्रचंड महागाई यामुळे ही सर्व महानगरे आपला नावलौकिक गमावून बसली आहेत. प्रथम श्रेणी नगरे म्हणून जी शहरे धावत होती तिथे आता इतकी बजबजपुरी झाली आहे, की त्यांना आता उगवती शहरे असे म्हणता येत नाही, किंवा संपूर्णतः उदयास आलेली शहरे असेही म्हणता येत नाही. दुसर्‍या श्रेणीतील अनेक शहरांनी उगवत्या शहरांच्या यादीत स्थान पटकावून आपली उपयुक्तता, वैशिष्ट्ये आणि सुप्त क्षमतांची देशाला जाणीव करून दिली आहे. महानगरे आणि प्रथम श्रेणीतील शहरे यांचा समावेश या यादीत का होऊ शकला नाही. याची कारणे बरीच आहेत.
 
मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता ही जुनी महानगरे आहेत. त्यांनी आपला विस्तार आणि लोकसंख्या समावेश याची महत्तम पातळी गाठली आहे. या चार महानगरांनी विकासाच्या सर्व आयामांना स्पर्श केलेला आहे. तरीही या महानगरातील विविध पायाभूत सुविधांची आवश्यकता निरंतर वाढत आहे. या शहरांनी अर्थ विश्व, आर्थिक घडामोडी, व्यापार उदीम, व्यवहार, उद्योगधंदे, उत्पादन, रोजगार, आस्थापना, कार्यालये, परिवहन, आंतरराष्ट्रीय केंद्रे, नागरीकरण, लोकसंख्येचे समावेशन, सेवा/ सुविधांची तजवीज, समाजोपयोगी कामे/ उपक्रम/ साधने हे सारे निर्मिलेले आहे. लोकसंख्येची घनता इथे महत्तम आहे. ही चार महानगरे ज्या राज्यात आहेत त्या राज्यात आणि इतर राज्यातही अनेक नवीन प्रथम आणि व्दितीय श्रेणीची शहरे विकसित झाली आणि नावारूपास आलेली आहेत. जसे की हैदराबाद, सिकंदराबाद, भोपाळ, अहमदाबाद, तिरुवनंतपूरम, पटना, जयपूर, पुणे, भुवनेश्वर, म्हैसुरु, नागपूर, नाशिक, ग्वालियर, कानपूर, चंडीगड, अमृतसर, गुवाहाटी इत्यादी. या शहरांचा उदय होत असताना इथे सर्व घटकांनी गर्दी करणे आणि त्यानिमित्ताने बाजारपेठ उभी राहणे हे घडून आले. कंपन्या, कारखाने यांनी तिकडे मोर्चा वळवून आपला कारभार सुरु करणे हे झाले. लोकांना रोजगार मिळाले. एक पूरक आणि पोषक अशी सहाय्यक व्यवस्था उभी राहिली. पण कालांतराने वाढीला, वाव निर्माण व्हायला मर्यादा आल्या. अनेक अर्थांनी ही महानगरे संपृक्त झाली होती आणि नव्याने उदयास आलेल्या प्रथम श्रेणी शहरांनी विविध व्यवस्थांमध्ये अनुतीर्ण झाली होती.
 
उगवत्या शहरांच्या सन 2026 च्या यादीत विशाखापट्टणम, लुधियाना, सुरत, वडोदरा, प्रयागराज, राजकोट, जबलपूर, रांची, रायपुर, विजयवाडा यांचा समावेश झालेला आहे. ही 10 शहरे प्रसरण पावत आहेत. विकसित होत आहेत. इथे रोजच्या जगण्याचा दर्जा चांगला आहे. महागाई फार नाही. इथे धावपळ, दगदग, वाहतूक कोंडी, प्रदूषण, नाही. हवामान चांगले आहे. जाणे येणे सुलभ आहे. रोजगाराच्या सोयी आणि साधने आणि पर्याय बहुसंख्य उपलब्ध होत आहेत. इथे जेवण, चहापाणी, अल्पोपहार, उपाहार, कपडे धुलाई यावरील खर्च परवडणारा आहे. भाडोत्री घरे उपलब्ध आहेत आणि भाडे वाजवी आहे. त्यामुळे या दहा शहरांकडे उद्योग आणि कामकरी यांचे लक्ष गेले असून यातून लाभकारी व्यवस्था आकाराला येऊन त्या भागाच्या विकासाला चालना मिळत आहे.
 
काय आहे या 10 शहरात?
 
1) विशाखापट्टणम हे मुळात एक बंदर आहे. सागरी जहाजांसाठी हा एक थांबा आहे. डिजिटल क्षेत्रातील मोठी  कार्यव्यवस्था येथे केंद्रीत झाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात मोठे नेतृत्व करतील अशी कामकाज यंत्रणा येथे आहे. डेटा सेंटर अर्थात विदा (माहीती) प्रक्रिया करणारी कार्यालये इथे आहेत. जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान क्षेत्रांनी इथे केंद्र सुरु केले आहे. इथले आघाडीचे उद्योग माहीती तंत्रज्ञान आणि सल्लागार सेवा, रसायन निर्मिती उद्योग, तंत्रज्ञान, माहीती आणि इंटरनेट हे आहेत. 
2) लुधियाना येथे कापड आणि विविध निर्मिती उद्योग आहेत. पायाभूत सेवा सुविधा सुधारल्या जात आहेत. आणि गुंतवणूक प्राधान्यपूर्ण आहे. इथले आघाडीचे उद्योग माहीती तंत्रज्ञान आणि सल्लागार, उच्च शिक्षण, बँक आणि आर्थिक क्षेत्रातील दुवा म्हणून काम करणारे अर्थक्षेत्र हे आहेत. 
3) सुरत येथे आता कपडा आणि हिरे यापलिकडे बहु स्तरीय उद्योग साकार झाले आहेत आणि पायाभूत सेवा सुविधा मजबूत होत आहेत. इथेही माहिती तंत्रज्ञान आणि सल्लागार सेवा, माहीती आणि इंटरनेट, बँक आणि आर्थिक क्षेत्रातील दुवा म्हणून काम करणारे अर्थक्षेत्र हे आघाडीचे उद्योग आहेत. इथे नोकर्‍या देणारे आघाडीचे उद्योग आहेत. 
4) वडोदरा हे एक ऐतिहासिक शहर आहे. देशातील आघाडीचे उद्योगांचे हे पसंतीचे शहर आहे. उपक्रम, गुंतवणूक, ज्ञानवंत मनुष्यबळ यासाठी हे देशाचे मध्यवर्ती स्थान आहे. इथले आघाडीचे उद्योग माहीती तंत्रज्ञान आणि सल्लागार सेवा, रसायन निर्मिती आणि यंत्रे निर्मिती हे आहेत. 
5) प्रयागराज हे अध्यात्मिक आणि धार्मिक शहर आहे. पायाभूत सेवासुविधांमधील सुधारणा आणि पर्यटनाला संपूर्ण वाव यामुळे हे शहर आर्थिक आणि आदरातिथ्य क्षेत्रास चालना देते झाले आहे. इथले आघाडीचे उद्योग माहीती तंत्रज्ञान आणि सल्लागार सेवा, उच्च शिक्षण, बँक आणि आर्थिक क्षेत्रातील दुवा म्हणून काम करणारे अर्थक्षेत्र हे आहेत. 
6) राजकोट ही उद्योगांची राजधानी आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांचे इथे मोठे जाळे आहे. निर्यात आणि महत्वाच्या पायभूत क्षेत्रात इथे मोठी गुंतवणूक झालेली आहे. इथले आघाडीचे उद्योग माहीती तंत्रज्ञान आणि सल्लागार सेवा, बँक आणि आर्थिक क्षेत्रातील दुवा म्हणून काम करणारे अर्थक्षेत्र, यंत्रे निर्मिती हे आहेत. 
7) जबलपूर येथे दारूगोळा कारखाना आहे. त्यामुळे संरक्षण आणि प्रशासन याचे ते एक प्रमुख केंद्र आहे. पायाभूत सेवा सुविधांवर या शहराने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे ते माहीती तंत्रज्ञान आणि व्यावसायिक क्षेत्राचे अंतिम स्थान सिद्ध होत आहे. इथले आघाडीचे उद्योग माहीती तंत्रज्ञान आणि सल्लागार सेवा, बँक आणि आर्थिक क्षेत्रातील दुवा म्हणून काम करणारे अर्थक्षेत्र, तंत्रज्ञान, माहीती आणि इंटरनेट हे आहेत.
8) रांची या शहरात पायाभूत सेवा सुविधा या क्षेत्रात मोठी गुंतवणूक झालेली आहे. उद्योग धंदे, व्यापार या क्षेत्रात गुंतवणुकीचे मोठे क्षेत्र म्हणून रांची उदयास येत आहे. येथील खाण उद्योग प्रसिद्ध आहे. इथले आघाडीचे उद्योग माहीती तंत्रज्ञान आणि सल्लागार सेवा, बँक आणि आर्थिक क्षेत्रातील दुवा म्हणून काम करणारे अर्थक्षेत्र आणि उच्च शिक्षण हे आहेत.
9) रायपुर हे शहर हे मध्य भारताचे माहीती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचे केंद्रस्थान म्हणून मान्यता पावत आहे. इथे डेटा सेंटर अर्थात विदा (माहीती) प्रक्रिया करणारी कार्यालये, सेमीकंडक्टर प्लांट, सौर उर्जा प्रकल्प यामुळे नागरी पायाभूत सेवा सुविधा साकार होण्यास प्रोत्साहन लाभले आहे.
10) विजयवाडा हे शहर विविध मार्गांनी इतर शहरांना जोडलेले आहे. माहीती तंत्रज्ञान क्षेत्रात येथे झालेली गुंतवणूक आणि घरबांधणी उद्योगातील तेजी यामुळे हे शहर व्यावसायिक क्षेत्राचे आधारस्तंभ झाले आहे. इथले आघाडीचे उद्योग माहीती तंत्रज्ञान आणि सल्लागार सेवा, बँक आणि आर्थिक क्षेत्रातील दुवा म्हणून काम करणारे अर्थक्षेत्र, तंत्रज्ञान आणि माहीती आणि इंटरनेट हे आहेत. इथे नोकर्‍या देणारे आघाडीचे उद्योग आहेत एचसीएल टेक, टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस आणि के एल युनिव्हर्सिटी.
 
उगवत्या शहरांच्या यादीत या दहा शहरांना 
 
महानगरांचे साचलेपण आणि जुनेपण, प्रथम श्रेणी शहरांची अव्यवस्था आणि अनास्था यामुळे उद्योग, व्यवसाय यांच्याकडून प्राधान्य लाभले. त्यामुळे रोजगार आणि मनुष्यबळ याचा संगम लाभून व्दितीय श्रेणीतील शहरांनी चेहरा मोहरा लख्खं करून प्रगतीच्या वाटेवर घोडदौड सुरु केली. दुर्दैवाने पुणे हे वाहतूक कोंडी, परिवहन सेवांची दुरवस्था, महाग सुविधा आणि व्यवस्था, गुन्हेगारी, सामान्य कायदा सुव्यवस्था यामुळे नापसंत झाले आहे. ही परिस्थिती सुधारली नाही तर पुणे हे केवळ गर्दीचे शहर म्हणून कायम राहील.

Related Articles