‘80-20’ नियमाने बचत वाढवा   

वृत्तवेध 
 
महिन्याच्या सुरुवातीला पगार खात्यात जमा झाला, की काही दिवसांमध्येच मोठा खर्च होतो आणि महिनाअखेरीस खात्यातील शिल्लक कमी झालेली दिसते. अशा परिस्थितीत बचत करणे अनेकांना कठीण वाटते. प्रत्येक खर्चाचा बारकाईने हिशेब ठेवण्याऐवजी ‘80-20’ बजेट नियमाचा वापर केला तर खर्च आणि बचत यांचा समतोल साधता येऊ शकतो. या नियमात पगाराचे केवळ दोन भाग करायचे असतात. उत्पन्नातील 20 टक्के रक्कम बचत आणि गुंतवणुकीसाठी बाजूला काढायची, तर उर्वरित 80 टक्के रकमेतून महिनाभराचे आवश्यक आणि आवडीचे खर्च भागवायचे. या नियमाची खासियत म्हणजे प्रत्येक खर्चाची वेगवेगळी वर्गवारी करण्याची गरज नसते. उदाहरणार्थ, 50-30-20 या पद्धतीत गरजा, इच्छा आणि बचत यांचे स्वतंत्र नियोजन करावे लागते. मात्र, 80-20 नियमात केवळ 20 टक्के रक्कम आधी बाजूला काढणे महत्त्वाचे असते. उरलेली 80 टक्के रक्कम आपल्या गरजेनुसार वापरता येते. त्यामुळे बचतीचे नियोजन तुलनेने सोपे होते आणि आवडीच्या गोष्टींवर खर्च करताना सतत अपराधी वाटण्याची गरज राहत नाही. पगार खात्यात जमा होताच बचतीची रक्कम वेगळी करणे हा या नियमाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. उदाहरणार्थ, एखाद्याचा हातात मिळणारा पगार 50 हजार रुपये असेल, तर 10 हजार रुपये सुरुवातीलाच बचत किंवा गुंतवणुकीसाठी बाजूला काढता येतील. ही रक्कम स्वतंत्र बचत खात्यात ठेवता येते किंवा एसआयपी, आवर्ती ठेव आणि पीपीएफसारख्या पर्यायांचा विचार करता येतो. 
 
महिन्याच्या शेवटी पैसे उरले तर बचत करू, असा विचार केल्यास अनेकदा बचतीसाठी काहीच रक्कम शिल्लक राहत नाही. त्यामुळे ‘आधी बचत, नंतर खर्च’ ही सवय लावणे अधिक उपयुक्त ठरू शकते. काहीजणांवर कर्ज किंवा क्रेडिट कार्डची थकबाकी असेल, तर बचतीसाठी बाजूला ठेवलेली 20 टक्के रक्कम कर्जफेडीसाठी वापरण्याचाही विचार करता येतो. विशेषतः जास्त व्याज असलेले कर्ज लवकर फेडल्यास भविष्यातील आर्थिक भार कमी होऊ शकतो. मात्र, कोणते कर्ज आधी फेडायचे आणि गुंतवणूक किती ठेवायची, याचा निर्णय आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार घ्यावा. उरलेल्या 80 टक्के रकमेत घरभाडे, किराणा, वीज आणि इतर बिलांसह बाहेर खाणे, चित्रपट, प्रवास किंवा खरेदीसारखे खर्चही नियोजनपूर्वक करता येतात. मात्र, या रकमेत महिन्याचे सर्व खर्च भागतात का, याचा अंदाज सुरुवातीलाच घेणे गरजेचे आहे. सुरुवातीला पगारातील 20 टक्के रक्कम वाचवणे अवघड वाटत असेल, तर दहा टक्क्यांपासून सुरुवात करता येते. बचतीची सवय लागल्यानंतर उत्पन्न वाढेल तसे हे प्रमाण हळूहळू 20 टक्क्यांपर्यंत नेता येईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बचतीची सुरुवात करणे आणि ती नियमित ठेवणे. 

Related Articles