वाचक लिहितात   

अखंड वंदेमातरम्ला नकार का?
 
वंदे मातरम् वरून पुन्हा भाजप व काँग्रेसमध्ये वादविवाद सुरू आहेत. हे वाचून वाईट वाटले. वंदे मातरम् असो किंवा जनगणमन असो, आपल्या देशाची शान, मान असणारी देशभक्तीपर गीते, वास्तविक पाहता पूर्णपणेच म्हटली गेली पाहिजेत. त्याला दुसरा पर्यायच असू शकत नाही. परंतु काँग्रेस मात्र 28 ऑक्टोबर 1936 मध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनात  ठरलेल्या प्रस्तावाचा आधार घेऊन ते पूर्णपणे न म्हणण्याची पळवाट शोधत आहे. वंदे मातरम् हे गीत पूर्णपणे म्हणण्यात काँग्रेसला नेमकी अडचण कोणती? याचा खुलासा काँग्रेसने करावा. काँग्रेस पाठोपाठ  केरळमधील सरकारी कार्यक्रमामध्ये वंदे मातरम चे संपूर्ण गीत गायले जाणार नाही. असे केरळचे आरोग्यमंत्री के मुरलीधरन आणि काँग्रेसचे खासदार राजमोहन उन्निथन यांनी स्पष्ट केले आहे. त्यांची व काँग्रेसची कृती म्हणजे मनमानीच झाली. वंदे मातरम् हे गीत पूर्णपणे न म्हणणे म्हणजे, हा आपल्या मातृभूमीचा पर्यायाने भारत देशाचा अपमान आहे. अशा देशविरोधी लोकांविरुद्ध कठोर कारवाई करणार? 
 
गुरुनाथ मराठे, बोरिवली (पूर्व), मुंबई
 
शास्त्रीय संगीताचा नवा चेहरा
 
सद्या सोशल मीडियावर नवनीत उन्नीकृष्णन या तरुण गायकाच्या गायनाचे अनेक विडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत. मूळचा केरळचा असलेल्या 22 वर्षीय नवनीत उन्नीकृष्णनने अमेरिकेत राहूनही हिंदुस्तानी आणि कर्नाटकी संगीताचे कठोर प्रशिक्षण घेतले आहे. अनेक झेन जी तरुणांची पावले पाश्चात्त्य संगीताकडे वळत असताना नवनीतने आपल्या भारतीय संस्कृतीची पाळेमुळे घट्ट धरून ठेवली आहेत, हे कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे त्याने आपल्या या शास्त्रीय गायकीची सांगड आधुनिक डिजिटल माध्यमांशी घातली असून त्याचे  डिजिटल सादरीकरण केवळ जुन्या पिढीलाच नव्हे तर आजच्या तंत्रज्ञानप्रेमी तरुण पिढीलाही मंत्रमुग्ध करत आहे. नवनीतने आपल्या अपार साधनेने आणि आधुनिक सादरीकरणाने शास्त्रीय संगीताला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. यास शास्त्रीय संगीतात करिअर करू इच्छिणार्‍या देशातील नवोदित कलाकारांना एक नवी दिशा मिळाली आहे. 
 
प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई     
 
महिलांना आदर हवाच
 
’नसरापूरची पुनरावृत्ती’ ह्या भेदक अग्रलेखाचे मनापासून स्वागत! बलात्काराविरूध्द कायदे आहेत, पोलिस यंत्रणा आहे., न्यायालये आहेत तरी ते होतच रहातात म्हणजेच ही विकृती समाजात आहे आणि पोसली जात आहे. कारण बलात्कार प्रकरणी पिडीता आयुष्यभर शिक्षा भोगणे पण आरोपी मात्र पुराव्याअभावी सुटतो व समाजात आणखी बलात्कार करायला मोकळा होतो. हा व्यत्यास जीवघेणा असून जोपर्यंत समाजातील प्रत्येक व्यक्ती बलात्कार थांबविण्याचा प्रयत्न करत नाही, स्त्रियांना आदर देणं शिकत नाही आणि तिला सर्वत्र मानाचं स्थान देत नाही तोपर्यंत हे गुन्हे होतच रहाणार आणि समाज तात्पुरता चुकचुकत रहाणार.
 
माया भाटकर, बाणेर पुणे 
 
स्तुत्य निर्णय
 
राज्यातील अनेक धरणात पावसाळ्याच्या दिवसात गोटे, माती रेती असे अनेक घटक वाहत येतात व ते धरणातील पाण्यात मिसळतात. वर्षानुवर्धे हे प्रक्रिया चालू असल्याने अनेक धरणे गाळानी  भरली आहेत. साहजिकच त्यामुळे धरणाची पाणी साठविण्याची क्षमता कमी होत आहे. आता जलसंपदा विभागणी एक सूचना जारी करून विनाशुल्क धरणातील गाळ काढण्यास मंजुरी दिली आहे ही बातमी नुकतीच वाचली. या आदेशामुळे आता शेतकरी किंवा अशासकीय संस्था यांना ना हरकत प्रमाणपत्राची गरज नाही. तसेच हा गाळ विनाशुल्क काढता येणार आहे. या योजनेमुळे धरणाची पाणी साठवण क्षमता वाढणारआहे. गाळामध्ये अनेक सेंद्रिय घटक असल्याने जमिनीची सुपीकता वाढीस लागण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे अनेक शेतकर्‍यांचा फायदा होणार असून त्यांना दिलासा मिळाला आहे. सरकारचा हा निर्णय स्तुत्य आहे.
 
शांताराम वाघ, पुणे
 
तमिळनाडूत मामाची अंगठी!
 
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता, टीव्हीके संस्थापक, तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी.जोसेफ विजय तथा थलापती यांच्या वाढदिवसापासून तमिळनाडूमध्ये मामाची सुवर्ण अंगठी भेट या कल्याणकारी योजनेचा प्रारंभ होणार आहे 22 जूनपासून सरकारी रुग्णालयात जन्माला आलेल्या मुलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 128499 अंगठ्यांची 22 कॅरेट किंमत 220 कोटी रुपये असेल. तमिळनाडू सरकारने एक वर्षासाठी 441667 अंगठ्यांच्या पुरवठ्याकरिता 755. 83 कोटी रुपयांची अदांजपत्रकात तरतूद केली आहे. अंगठ्यासाठी राज्य सरकारने सध्याच्या बाजारभावानुसार सोन्याचे पैसे देण्याचे कबूल केले आहे तर जोयालुक्कास 89949 अंगठ्या आणि कल्याण ज्वेलर्स 38550 अंगठ्या देणारं आहे. या पक्षाने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार नवजात बालकांसाठी मामाची सुवर्ण अंगठीची भेट योजना कार्यान्वित करण्यासाठी तमिळनाडू सरकार गतिमान झाले असून, ही योजना तमिळनाडूसाठी गेम चेंजर ठरणारं की नुसताच आश्वासन ठरणारं हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणारे आहे ! 
 
राजू जाधव, मांगूर जि. बेळगांव 

Related Articles