पाकिस्तानच्या रुग्णालयातील १४ बालकांचा होरपळून मृत्यू   

इस्लामाबाद : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये भीषण आग लागून १४ बालकांचा मृत्यू झाला. स्त्री रोग विभागात सकाळी सात वाजता आग लागली होती. 
 
पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हे देशातील सर्वात मोठे सार्वजनिक रुग्णालय म्हणून ओळखले जाते. इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर माता आणि मुलांचा आरोग्य विभाग आहे. तेथे आगीचा भडका उडाला होता. आगीत होरपळून १४ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.  रुग्णालयाच्या प्रवक्त्या डॉ. अनिझा जलाली यांनी सांगितले विभागात १५ नवजात बालके होती. डॉक्टरांनी एका बालकाला वाचविले. त्यांनी सांगितले की, शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी. भडकलेली आग नियंत्रणात आणली आहे. आग लागली तेव्हा दोन डॉक्टर अन् कर्मचारी विभागात होते. दरम्यान, संसदीय व्यवहार मंत्री तारीक फैजल चौधरी यांनी सांगितले की, विभागात ऑक्सिजनची वाहिनी होती. त्यामुळे आग आणखी पसरत गेली होती. दुर्घटनेला जबाबदार असणार्‍यांवर कारवाई केली जाईल आणि १४ तासांत प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.   
 
दरम्यान, आगीनंतर युद्धपातळीवर मदतकार्य राबविले. अग्निशमन दलाचे सहा बंब आणि चार रुग्णवाहिका घटनास्थळी धावल्या होत्या. त्यांनी आगीवर नियंत्रण आणले. अतिरिक्त उपायुक्त (सामान्य) यांच्यात नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली. 
 

Related Articles