महापालिकेच्या नाकाखाली 52 जुन्या वृक्षांची कत्तल   

उद्यान विभागाच्या भूमिकेवर ‘आप’कडून प्रश्नचिन्ह

पिंपरी : महापालिका मुख्यालयाच्या शेजारी सुरू असलेल्या एका खासगी प्रकल्पाच्या बांधकामात अडथळा ठरत असल्याचे कारण देत 52 जुन्या वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. या वृक्षांचे सरासरी वय सुमारे 104 वर्षे असल्याने या प्रकाराबाबत पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे.
 
या 52 वृक्षांपैकी 33 वृक्ष मुळासकट काढून टाकण्यात आल्याचा दावा ‘आप’ युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष ऋषिकेश कानवटे यांनी केला. उर्वरित 19 वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले, तरी ते जगतील का, याबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली आहे. वृक्षतोडीच्या भरपाईपोटी संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून प्रति वृक्ष 15 हजार रुपये याप्रमाणे 20 लाख 70 हजार रुपये वसूल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, आर्थिक दंड वसूल करून शतकभर जुन्या वृक्षांचे पर्यावरणीय नुकसान भरून निघू शकत नाही, असे कानवटे म्हणाले.
 
महापालिका मुख्यालयाच्या नाकाखाली वृक्षतोड होत असेल तर शहरातील इतर भागातील झाडे किती सुरक्षित आहेत, असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित बांधकाम व्यावसायिकाचा परवाना रद्द करावा तसेच दोषी उद्यान अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

Related Articles