१०० जणांचा मृत्यू; १०५ भारतीयांसह ७५० हून अधिक बेपत्ता   

 

काठमांडू : तिबेटमधील भूकंपामुळे नेपाळमध्ये बुधवारी विनाशकारी जलप्रलय आला. या दुर्घटनेत जवळपास 100 जणांचा मृत्यू झाला असून, 133 भारतीयांसह 750 हून अधिक जण बेपत्ता आहेत. नेपाळमधील सात जिल्ह्यांना महापुराचा मोठा फटका बसला असून, अनेक शहरे आणि गावे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक घरे, इमारती, वाहने, पूल वाहून गेले असून, एक डझनहून अधिक जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले आहे. नेपाळच्या लष्कराने युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू केले असून, नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. अवघ्या काही क्षणात महाविध्वंस घडविणार्‍या प्रलयकारी महापुराची थरकाप उडवणारी दृश्ये समोर आली आहेत. 
 
तिबेटमध्ये सकाळी 8:37 वाजता भूकंप झाला आणि त्यानंतर तीन मिनिटांनी पुराची माहिती मिळाली, अशी माहिती नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी दिली. पूरग्रस्त भागातून 93 जणांची सुटका करण्यात आली आहे. रसुवा येथील पुरात 384 जण बेपत्ता झाले असून, त्यामध्ये 341 परदेशी पर्यटक आणि 93 स्थानिक नागरिकांचा समावेश आहे, असे नेपाळ पर्यटन मंडळाने सांगितले. बेपत्ता पर्यटकांमध्ये 133 भारतीयांसह 37 अनिवासी भारतीयांचा समावेश आहे. यातील बहुतांश भारतीय तिबेटमधील कैलास मानसरोवर यात्रेसाठी निघाले होते. बेपत्ता पर्यटकांमध्ये अमेरिका, मलेशिया, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्समधील काही नागरिकांचा समावेश आहे. नेपाळ पर्यटन मंडळाने मदतीसाठी टोल-फ्री आपत्कालीन क्रमांक 1234, हॉटलाइन 1144 किंवा 9851289445  या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
 
दरम्यान, काल सायंकाळपर्यंत सात जिल्ह्यांतून 72 मृतदेह बाहेर काढण्यात आले. रसुवामध्ये 1, नुवाकोटमध्ये 11, धाडिंगमध्ये 18, चितवनमध्ये 28, गोरखा येथे 9, तनहूमध्ये 4 आणि नवलपरासी पूर्वमध्ये 1 मृतदेह सापडला. भूकंपाच्या धक्क्यांमुळे हिमनदीचे पाणी अचानक बाहेर पडले आणि हा पूर आला. भोटे काशी नदीला अचानक महापूर आला. तिबेटच्या सीमेला लागून असलेल्या रसुवा आणि धाडिंग जिल्ह्याला त्याचा मोठा फटका बसला. तिबेट सीमेजवळील रसुवा जिल्हा काठमांडूपासून ईशान्येला सुमारे 125 किमी अंतरावर आहे. या पुराचे पाणी नुवाकोट आणि चितवन जिल्ह्यांपर्यंत पोहोचले. यात चार पूल वाहून गेले. तर, काही पुलांचे मोठे नुकसान झाले.
 
उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांनुसार, नेपाळ-तिबेट सीमेजवळील डोंगराळ भागातील दरड कोसळल्यामुळे हा पूर आला. नेपाळच्या नेपाळ राष्ट्रीय आपत्ती जोखीम आणि व्यवस्थापन प्राधिकरणानुसार, दरड कोसळल्यामुळे नेपाळ-तिबेट सीमेवरील ’ल्हेंदेे’ नदीची पातळी वाढली. त्यानंतर मोठ्या वेगाने पाणी भोटेकोशी आणि त्रिशूली नदीत आले. त्यानंतर, नुवाकोट, चितवन, गोरखा, तनहू आणि नवलपरासी पूर्व जिल्ह्यांत पसरले.अमेरिकेच्या ’जिओलॉजिकल सर्व्हे’नुसार, सकाळी 8:37 वाजता गोसाईकुंडाच्या उत्तरेस सुमारे 47 किलोमीटर अंतरावर तिबेटच्या भूभागात 4.4 तीव्रतेचा भूकंप झाला.
 
रसुवा जिल्ह्यातील तिमुरे आणि श्याफ्रुबेसी परिसरास पुराचा मोठा फटका बसला आहे. पुरामध्ये अनेक वाहने आणि घरे वाहून गेली आहेत. पायाभूत सुविधांनादेखील मोठा फटका बसला आहे. रसुवा, नुवाकोट, धाडिंग आणि चितवनसह नदीकाठच्या जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.
महापुराचा रसुवाला सर्वाधिक फटका बसला, असे अधिकार्‍यांनी सांगितले. पुराची तीव्रता पाहता मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली असण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.नुवाकोट जिल्ह्यातील बिदूर नगरपालिका हद्दीत त्रिशुली नदीकाठावर चार मृतदेह सापडले. यामध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे, असे पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले.
 
नदीकाठच्या नागरिकांना इशारा
 
रसुवा, नुवाकोट, धादिंग, चितवन आणि गोरखा येथील नदीकाठावरील नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत सावध राहण्याचे आवाहन नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे. नदीकाठच्या नागरिकांना तातडीने सुरक्षित आणि उंच ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुराचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
 
नेपाळच्या पंतप्रधानांकडून आढावा
 
नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शहा यांनी तातडीने आपत्कालीन बैठक बोलावली आणि परिस्थतीचा आढावा घेतला. पंतप्रधानांनी पूरग्रस्त भागात युद्धपातळीवर बचाव आणि मदत कार्य राबविण्याचे आदेश दिले. यासाठी नेपाळ लष्कर, सशस्त्र पोलिस आणि आणि नागपूर पोलिसांची मदत घेण्यात येत आहे. 
 
हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य
 
नेपाळ लष्कराने पूरात अडकलेल्या आणि पूरात वाहून गेलेल्या नागरिकांसाठी 12 हेलिकॉप्टर तैनात केली आहेत.   रसुवा जिल्ह्यातील स्याफ्रुबेसी येथून सहा, मैलुंग येथून दोन आणि धुंचे येथून चार जणांना वाचवण्यात आले, असे लष्कराने सांगितले. त्रिशुली येथील लष्करी प्रशिक्षण केंद्रात पूरग्रस्तांसाठी उपचार केंद्र स्थापन करण्यात आले असून, या ठिकाणी लष्कराचे वैद्यकीय अधिकारी चोवीस तास उपलब्ध असतील, असे लष्कराने म्हटले आहे. आपत्कालीन वैद्यकीय बचाव पथकासह लष्कराचे एक हेलिकॉप्टर (एमआय17) त्रिशुली येथील जिल्हा रुग्णालयाच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे, असेही लष्कराने निवेदनात म्हटले आहे. 
 
आठ विद्युत प्रकल्पांचे नुकसान
 
महापुरामुळे नुवाकोट आणि रसुवा जिल्ह्यांतील ३५४ मेगावॅट क्षमतेचे आठ विद्यूत प्रकल्प उद्ध्वस्त झाले. तर, बांधकाम सुरू असलेल्या पाच प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रमुख जलविद्युत प्रकल्पांमध्ये रसुवागढी जलविद्युत प्रकल्प (111 मेगावॅट), संजेन खोला जलविद्युत प्रकल्प (78 मेगावॅट) आणि अप्पर त्रिशुली 3ए (60 मेगावॅट) यांचा समावेश आहे. स्याफ्रुबेसी, बेत्रावती, मैलुंग, सालेतार, शांतीबाजार, पैरेबेसी, खाल्टी बस्ती, सोले, त्रिशुली आणि बत्तार यासह सुमारे डझनभर वस्त्यांना फटका बसला आहे.
 
लष्कराच्या ४४ जवानांसह ८० सुरक्षा कर्मचारी बेपत्ता
 
नेपाळ लष्कराच्या 44 जवानांसह 80 सुरक्षा कर्मचारी बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी दिली. रसुवामध्ये तैनात चार जवान बेपत्ता आहेत, असे निम लष्करी दलाचे प्रवक्ते बहादूर कार्की यांनी सांगितले. रसुवागढी पोलिस चौकीतील 22 पैकी 13 पोलिसांचा संपर्क झाला असून, नऊ पोलिसांशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. स्याफ्रूबेसी परिसरातील नऊपैकी तीन पोलिसांशी संपर्क झाला असून अद्याप सहा जणांशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही, असे अधिकार्‍यांनी सांगितले. स्याफ्रुबेसी आणि रसुवागढी येथील पोलीस चौकीसह तिमुरे येथील पोलिस कार्यालयाचे नुकसान झाले असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.
 

Related Articles