चारशे सदस्यांच्या शिष्टमंडळासह चीनचे अध्यक्ष झी यांचा भारत दौरा   

ब्रिक्स शिखर परिषदेला हजर राहणार 

नवी दिल्ली  : ब्रिक्स  शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी चीनचे अध्यक्ष  झी जिनपिंग पुढील महिन्यात सप्टेंबरमध्ये भारताचा दौरा करणार आहेत. सुमारे ४०० जणांचे शिष्टमंडळासह ते दौर्‍यावर येणार असल्याचे सांगण्यात आले असले ती दौर्‍याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.  
 
ब्रिक्स  शिखर परिषद १२ आणि १३ सप्टेंबर रोजी आयोजित केली आहे. झी यांचा  दौरा जवळपास सात वर्षांनंतर प्रथमच होणार आहे. झी यांच्यासोबत सुमारे ४०० चिनी अधिकार्‍यांचे प्रतिनिधी मंडळ येण्याची शक्यता आहे. २०१९ मधील दौर्‍याच्या तुलनेत हा ताफा दुप्पट आकाराचा असेल. दरम्यान, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सध्या बीजिंगमध्ये असून ते चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी सीमाविषयक चर्चा करत आहेत. या उच्च-स्तरीय बैठकांचा उद्देश संबंधांमध्ये स्थिरता आणणे आहे. त्यांचा दौरा हा  पंतप्रधान नरेंद्र मोदी व झी यांच्यातील संभाव्य द्विपक्षीय बैठकीसाठी पाया रचणे आहे. 
 
दोन्ही देशांचे संबंध  २०२० मधील गलवान खोर्‍यातील प्राणघातक सीमा संघर्षांनंतर ताणले होते. मात्र, वाटाघाटी आणि चर्चेनंतर ते निवळले होते यानंतर  राजनैतिक संबंध सुधारण्याच्या दिशेने देशानी पाऊल टाकले. राजनैतिक सूत्रांनुसार, चिनी अधिकारी हॉटेलमधील निवास व्यवस्था आणि सुरक्षा शिष्टाचार  अंतिम करण्यासाठी आधीच भारतात दाखल झाले आहेत. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप झी यांच्या  दौर्‍याचा अधिकृत आणि अंतिम कार्यक्रम जाहीर केलेला नाही. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन सुद्धा  शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

इराण-अमेरिका संघर्षाची झालर

पश्चिम आशियात इराण आणि अमेरिका यांचे संबंध विकोपाला गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर झी यांचा भारत दौरा निश्चित झाला तर भूराजकीय स्थितीवर परिणाम होणार आहे. रशियाचे अ:ध्यक्ष पुतीन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि झी यांंची एकत्र होणारी बैठक अमेरिकेसाठी चिंतेची बाब ठरणार आहे. दोन लोकसंख्येतील आघाडीचे देश आणि आर्थिक प्रगतीचे स्वप्न पाहणारे भारत आणि चीन व अमेरिकेचा जुना शत्रू रशिया यांची युती झाली तर अमेरिकेसाठी ते मोठे आव्हान ठरणार आहे.

Related Articles