विद्यार्थी आंदोलनाचा बिहारमध्ये भडका   

विद्यार्थ्यांची दगडफेक; पोलिसांकडून लाठीमार

पाटणा : दिल्ली, झारखंडपाठोपाठ आता बिहारमधील पाटण्यात विद्यार्थी आंदोलनाचा भडका उडाला आहे. बीपीएससी-टीआरई ४  परीक्षेसह विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे निघालेला विद्यार्थ्यांचा निषेध मोर्चा पोलिसांनी रोखला. त्यावेळी पोलिस आणि आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये झटापट झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या दगडफेकीत अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.
 
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी बीपीएससी (बिहार लोक सेवा आयोग) चे उमेदवार आणि इतर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात पाटण्यातील गांधी मैदानावर जमले. त्यानंतर, त्यांनी डाक बंगला चौकाकडे मोर्चा वळवला. मात्र, पोलिसांनी आधीच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जाणारा मार्ग बंद केला होता. 
 
पोलिसांनी बॅरिकेड्स लावून आंदोलकांना डाक बंगला चौकात रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थ्यांनी हे अडथळे तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विद्यार्थ्यांना पांगविण्यासाठी पाण्याचा मारा केला. मात्र, विद्यार्थी मागे हटले नाहीत. आंदोलनादरम्यान काही विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.
 
राज्य सरकारच्या नवीन ’टाउनशिप’ धोरणाविरुद्ध आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांचा एक गटही विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सामील झाला होता. त्यांनी भू-संपादनापासून संरक्षण मिळावे, अशा मागणीचे फलक हातामध्ये घेतले होते. पाटण्यात  ८१,७३० एकरवर ’पाटलीपुत्र ग्रीनफील्ड सॅटेलाइट टाउनशिप’उभारला जाणार आहे. 
 
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व प्रमुख चौकांमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विशेषतः डाक बंगला चौकात केंद्रीय राखीव पोलिस चौक (सीआरपीएफ) आणि शीघ्र कृती दलाच्या (आरएएफ) जवानांसह अतिरिक्त पोलिस दैल तैनात करण्यात आला होता.
मागील काही आंदोलनापासून विद्यार्थी पाण्यातील गर्दनीबाग परिसरात आंदोलन करत आहेत. ७० व्या बीपीएससी परीक्षेत अनियमितता असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. 
 

Related Articles