भारताने अमेरिकेकडून एलपीजी, एलएनजीची आयात वाढवली   

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संषर्घामुळे आखाती देशांतून होणारा खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा जागतिक पुरवठा विस्कळीत झाला आहे. आखाती देशांतील पारंपरिक पुरवठादारांकडून होणार्‍या निर्यातीवर मर्यादा आल्याने भारताने अमेरिकेकडून एलपीजी आणि एलएनजीची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.
 
सागरी गुप्तचर संस्था केप्लरच्या आकडेवारीनुसार, भारताने ऑगस्ट महिन्यात अमेरिकेतून सुमारे ०.६२ दशलक्ष टन एलपीजी आयात केला. जुलै महिन्यात ०.८९ दशलक्ष टन एलपीजी आयात करण्यात आला होता. या दोन्ही महिन्यांत देशाच्या एकूण गरजेपैकी ७३ टक्के एलपीजीची आयात करण्यात आली. ऑक्टोबर २०२५ मध्ये भारताने पारंपरिक पुरवठादार संयुक्त अरब अमिरातीकडून ०.८९१ दशलक्ष टन एलपीजी आयात केला होता. यंदाच्या जुलैमध्ये भारताने जवळपास तेवढाच एलपीजी अमेरिकेकडून मागवला आहे.
 
इराण आणि अमेरिकेतील संघर्षामुळे होमुर्झ सामुद्रधुनीतून होणारा जागतिक ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला आहे. भारतालादेखील याचा फटका बसला आहे. इराण आणि अमेरिका दोघांकडूनही होर्मुझ सामुद्रधुनीवर वर्चस्वावरुन संघर्ष कायम आहे. दोन्ही बाजूंकडून ते जल वाहतूक रोखत आहेत. 
केप्लरच्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये संयुक्त अरब अमिरातीची एलपीजी आयात सुमारे १,४०,००० टनांपर्यंत घसरली. तर कतारने सुमारे ६०,००० टन पुरवठा केला. सौदी अरेबियाने जुलै किंवा ऑगस्ट या दोन्ही महिन्यांत भारताला एलपीजीचा पुरवठा केला नाही. एलएनजीच्या बाबतीत हेच चित्र आहे.
 

Related Articles