अभिषेक बॅनर्जी यांना ३ प्रकरणांत अटकेपासून दिलासा   

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना कोलकाता उच्च न्यायालयाने मंगळवारी मोठा दिलासा दिला. अभिषेक यांच्याविरोधातील तीन फौजदारी प्रकरणांत ३० नोव्हेंबरपर्यंत कोणतीही कारवाई केली जाऊ नये. तसेच, या प्रकरणांत कोठडीतील चौकशीची कोणतीही आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.
 
न्यायमूर्ती सौगत भट्टाचार्य यांनी अभिषेक यांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय परदेशात प्रवास न करण्याचे निर्देश दिले. मात्र, वैद्यकीय कारणास्तव तीन आठवड्यांसाठी परदेशात जाण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अभिषेक यांना दिलेल्या परवानगीला हा आदेश लागू होणार नाही, असेही स्पष्ट केले.
 
या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ नोव्हेंबर रोजी होईल. त्यावेळी या तीन प्रकरणांमधील तपासाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले. तसेच, अभिषेक यांना तपासात सहकार्य करण्याचे आणि या तीन प्रकरणांसंदर्भात बजावण्यात आलेल्या नोटिसांचे पालन करण्याचे निर्देश दिले.
 
तपास अधिकार्‍यांसमोर हजर राहण्यासाठी अभिषेक यांना किमान ४८ तांस आधी नोटीस दिली जावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले. अभिषेक यांनी तपासात सहकार्य केले नाही, तर संबंधित पोलिस अधिकारी न्यायालयाकडे दाद मागू शकतात, असेही त्यांनी नमूद केले. सर्वोच्च न्यायालयाने १० ऑगस्ट रोजी अभिषेक वैद्यकीय कारणास्तव परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. 

Related Articles