आदिवासी वसतिगृहासाठी वयाची अट अखेर रद्द!   

मुंबई, (प्रतिनिधी) : आदिवासी विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत राज्य सरकारने १४ ऑगस्ट रोजीचा शासन निर्णय मागे घेतला आहे. वसतिगृहातील प्रवेशासाठी ३० वर्षे वयाची कमाल मर्यादा घालण्यात आली होती. ही अट रद्द करण्यात आली असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली. आदिवासी विद्यार्थी याबाबत आंदोलन करत आहेत. तसेच, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहिले आहे. या पाश्वर्र्भूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
 
शासकीय आदिवासी वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या सोयी-सुविधा, प्रवेश प्रक्रिया तसेच वसतिगृह व्यवस्थापनाच्या विविध बाबींवर आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती. या बैठकीस मंत्री नरहरी झिरवळ, आदिवासी खासदार, आमदार, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था  आयुक्त निलेश सागर यावेळी उपस्थित होते.

सुधारित कार्यपद्धती निश्चित होणार 

शासकीय आदिवासी वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आवश्यक सोयी-सुविधा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी तसेच वसतिगृह व्यवस्थेत सुसूत्रता आणण्यासाठी प्रवेश प्रक्रिया, सोयी-सुविधा, प्रशासकीय कार्यपद्धती, देखरेख व तपासणी याबाबत सुधारित कार्यपद्धती निश्चित करण्यात यावी. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस पोषक वातावरण उपलब्ध व्हावे, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री उईके यांनी बैठकीत दिले. वसतिगृह व्यवस्थेतील अडचणी दूर करून विद्यार्थ्यांना सुविधा अधिक परिणामकारकपणे उपलब्ध करून देण्यात याव्यात. लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा सकारात्मक विचार करून विद्यार्थीकेंद्रित, पारदर्शक आणि अधिक सक्षम वसतिगृह व्यवस्था निर्माण करण्यासाठी काम करण्याबाबतही मंत्री उईके यांनी यावेळी सांगितले.
 
आदिवासी विकास विभागाने अलीकडेच जारी केलेल्या शासन निर्णयानुसार वसतिगृहातील प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट लागू केली होती. वयाची ३० वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. मात्र, मंगळवारच्या बैठकीनंतर ही अट रद्द करण्यात आली असल्याची माहिती मंत्री उईके यांनी दिली. 
 

Related Articles