मराठी शिकण्यासाठी रिक्षा-टॅक्सी चालकांना आणखी तीन महिन्यांची संधी   

पावणेदोन लाख चालकांनी घेतला प्रशिक्षणाचा लाभ

मुंबई, (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालवणार्‍या चालकांना मराठीत किमान बोलता आले पाहिजे. मराठीचे जुजबी ज्ञानही नसेल तर परवाना रद्द करण्याची कारवाई करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला होता. अमराठी चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता यावा, यासाठी परिवहन विभागाने राबविलेल्या १०५ दिवसांच्या विशेष मराठी भाषा प्रशिक्षण उपक्रमाला मोठा प्रतिसादही मिळाला. मात्र, मराठी भाषा शिकण्यासाठी आणखी मुदतवाढ द्यावी ही मागणी होती. ती मान्य करून चालकांना आणखी तीन महिन्यांची मुदत देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
 
मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री सरनाईक यांनी ही माहिती दिली. यावेळी कामगार नेते शशांक राव, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. परिवहन विभागाने राबविलेल्या १०५ दिवसांच्या विशेष मराठी भाषा प्रशिक्षण उपक्रमांतर्गत राज्यातील सुमारे १ लाख ६५ हजार ८०० रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यात आले. परंतु, अद्यापही मराठीचे प्रशिक्षण न घेतलेल्या चालकांसाठी कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या माध्यमातून कार्यशाळा सुरू ठेवण्यात येणार आहेत, असे सरनाईक यांनी सांगितले. 
 
रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी अतिरिक्त मुदत देण्यात येणार आहे. प्रारंभी संबंधित चालकांना एक महिन्याची मुदत, त्यानंतर आवश्यक असल्यास आणखी तीन महिन्यांचा कालावधी दिला जाईल. या काळात चालकांना मराठी शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल. या प्रक्रियेत संबंधित कायद्यानुसार बॅज निलंबित करण्याची कारवाई होऊ शकते; मात्र या तीन महिन्यांच्या कालावधीत बॅज रद्द केला जाणार नाही. त्यानंतरही मराठी भाषा शिकण्यास जाणीवपूर्वक नकार दिल्यास कायद्यानुसार बॅज रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा सरनाईक यांनी दिला.
 

Related Articles