मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात आज मध्यम स्वरूपाचा पाऊस   

पुणे : मागील चार ते पाच दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणच्या पावसात घट झाली आहे. आज (गुरूवारी) मराठवाड्यातील बहुतांश भागात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तसेच खान्देशात हलका ते मध्यम स्वरूपाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. घाट माथ्यावर मात्र पावसाचे सातत्य कायम असणार आहे. आज या भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. 
 
नाशिक शहरासह जिल्ह्यातील घाटमाथा, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी वीजांसह पावसाचा अंदाज आहे. नंदुरबार, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यातील घाटविभाग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, आणि नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वीजांसह पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात ढगाळ वातावरणासह पावसाची उघडीप असणार आहे. राज्यात मोठ्या पावसाची शक्यता कमीच आहे. उत्तर महाराष्ट्रातील हवामानात काहीसा बदल होण्याची शक्यता आहे. या भागांत मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
 
सद्य:स्थितीत ईशान्य मध्य प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण उत्तर प्रदेश आणि लगतच्या ईशान्य मध्य प्रदेशात सरकले आहे. या प्रणालीशी संबंधित चक्रकार वार्‍याची स्थिती समुद्रसपाटीपासून 4.5 किलोमीटर उंचीपर्यंत विस्तारली आहे. मान्सूनचा आस जम्मू, डेहराडून, शाहजहानपूर, दक्षिण उत्तर प्रदेशातील कमी दाबाचे केंद्र रांची, दिघा आणि त्यानंतर आग्नेय दिशेने ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रीय आहे. 
 
पुण्यात ऊन सावलीचा खेळ 
 
मागील काही दिवसांपासून पुण्यात ऊन सावलीचा खेळ सुरू आहे. काल सकाळी शहरासह उपनगरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यानंतर दुपारी ऊन पडले होते. सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. आज (गुरूवारी) शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शहराप्रमाणेच धरण क्षेत्रातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. 
 
मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट 
 
पावसाला सुरूवात झाल्यापासून मराठवाड्यातील अनेक भागात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे अनेक भागातील पेरण्यांना विलंब झाला. ज्या भागात पेरण्या झाल्या त्या भागात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पीके वाया जाणार असल्याची स्थिती आहे. काही भागात शिल्लक पाणी साठ्याचे प्रमाण खुपच कमी असल्यामुळे पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पावसाअभावी शेतकरी चिंतेत आहेत. एकट्या धाराशिव जिल्ह्यातील 103 गावांत आतापासूनच    पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. 

Related Articles