राख्यांच्या खरेदीसाठी बाजारात लगबग   

रांजणगाव, (वार्ताहर) : रक्षाबंधन सणाला अवघे काही दिवस राहिल्यामुळे शिरुर शहर व तालुक्यातील बाजारपेठांमध्ये राख्या खरेदी करण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. गावोगावी बाजारपेठेत राख्यांची दुकाने विविधरंगी आणि आकर्षक राख्यांनी सजली असल्याचे दिसून येत आहेत.रक्षाबंधन सणानिमित्त मागील वर्षीप्रमाणेच यंदाही आधुनिक, पारंपरिक, पर्यावरणपूरक आणि वैयक्तिक आवडीला प्राधान्य देणार्‍या राख्यांना महिलांची अधिक पसंती मिळत आहे. मोत्याच्या राख्या, फॅन्सी राख्या, रुद्राक्षाच्या राख्या, कार्टूनच्या राख्या आणि लहान मुलांसाठी विविध आकर्षक डिजाईन असलेल्या राख्या दुकानांमध्ये पहायला मिळत आहेत. तसेच ओम, गणपती, सिल्व्हर लूक आणि एलईडीच्या राख्या सर्वांचे लक्ष वेधून घेत असून, लहान मुलांसाठी सुपर हिरो व कार्टूनच्या राख्यांना विशेष मागणी आहे. 
 
रक्षाबंधन सण हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने राखी खरेदी करिता महिलांची मोठी गर्दी वाढली असून, विक्रेत्यांनीही विविध प्रकारच्या राख्यांचा मोठा साठा उपलब्ध करुन ठेवला असल्याचे दिसून येते. दरम्यान, राखीसोबत पेढे, चॉकलेट, मिठाई, ड्रायफ्रुटस व वैयक्तिक भेटवस्तूंचे कॉम्बोलाही मोठी मागणी दिसून येत आहे.

राख्यांचे दर 

गोंड्याच्या राख्या - ३ ते ५ रुपये प्रति नग.
मोत्याच्या राख्या - १५ ते ४० रुपये प्रति नग.
खड्याच्या राख्या - १० ते २० रुपये प्रति नग.
विविध प्रकारच्या आकर्षक राख्या - १०० ते ४०० रुपये प्रतिनग.
 

Related Articles