चिंकारांच्या कळपांमुळे बोडक्या माळरानांना नवे सौंदर्य   

बेल्हे, (वार्ताहर) : जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील आळे, राजुरी, आणे, नळावणे परिसरातील बोडकी माळराने सध्या गवताच्या हिरव्या झालरीत न्हालेली दिसत असून, या माळरानांवर मुक्तपणे चरणार्‍या चिंकारा हरणांच्या कळपांनी परिसराच्या सौंदर्यात भर घातली आहे. काही महिन्यांपूर्वी हिरवाईने नटलेले डोंगर उतार आता हिरव्या रंगात रंगले असून, याच हिरव्या चार्‍यावर चिंकारा ताव मारताना दिसत आहेत.
 
पहाटे तांबडे फुटताच शांत वातावरणात ५ ते १० चिंकारांचा कळप एकत्र चरताना पाहायला मिळतो. सावध हालचाली, टवटवीत अंगकाठी आणि वार्‍यासोबत डुलणार्‍या गवतामधील त्यांची उपस्थिती पाहून पर्यटक मंत्रमुग्ध होतात. माळरानाच्या रंगाशी मिळता-जुळता अंगावरील रंग असल्याने शत्रूपासून बचावासाठी चिंकारा बोडक्या माळरानालाच पसंती देतात. 
 
या निसर्गरम्य दृश्यामुळे आतापर्यंत उजाड समजली जाणारी माळराने आता पर्यटनाच्या नकाशावर झळकू लागली आहेत. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात हिवाळी सफारीसाठी येणार्‍या पर्यटकांची पावले सध्या नळावणे च्या माळरानाकडे वळू लागली आहेत. विशेषतः प्राणीमित्र व छायाचित्रकारांसाठी ही माळराने आकर्षणाचे नवे केंद्र ठरत आहेत. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, चिंकारा हरणे मोकळ्या, कोरड्या व गवताळ प्रदेशात राहणे पसंत करतात. त्यामुळे नळावणे परिसरातील बोडकी माळराने त्यांच्यासाठी अत्यंत अनुकूल अधिवास ठरत आहेत. येथे चिंकारांना अभय मिळत असल्याने त्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 
 
सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या नळावणे परिसरात वनविभागाच्या जंगलासह शेतकर्‍यांच्या शेतीतही चिंकारांच्या कळपांची वर्दळ वाढली आहे. यामुळे हा परिसर जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत असून, भविष्यात वन्यजीव संवर्धन व निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने येथे नियोजनबद्ध विकास होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Related Articles