कास परिसरात दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प   

सातारा, (प्रतिनिधी) : कास तलाव परिसरातील निसर्गसंपदा आणि जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी जनसेवा फाउंडेशन आणि कर्तव्य सोशल ग्रुपने व्यापक वृक्षलागवड मोहीम हाती घेतली आहे. कास परिसरात आगामी काळात तब्बल दहा हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प केला असून, त्याची सुरुवात ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ५०० रोपांच्या लागवडीने होणार असल्याची माहिती जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अभिजित देशपांडे व डॉ. देवेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
डॉ. देवेंद्र पाटील म्हणाले, जनसेवा संघटना आणि कर्तव्य सोशल ग्रुप यांच्या संयुक्त सहकार्याने तलाव परिसरातील उपलब्ध मोकळ्याजागा, नगरपालिका मालकीच्या जागा तसेच धरणाच्या भिंतीलगतच्या परिसरात लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचे उद्घाटन कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्ष वेदांतिका भोसले यांच्या हस्ते होणार आहे. कासच्या स्थानिक हवामानाला आणि नैसर्गिक अधिवासाला अनुरूप प्रजातींची निवड केली जाणार आहे. केवळ रोपे लावण्यापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता त्यांच्या देखभाल वं संगोपनाची जबाबदारीही घेण्यात येणार आहे. या मोहिमेत स्थानिक ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संस्थांनी मोहिमेत सहभागी व्हावे. कासचे नैसर्गिक सौंदर्य, पर्यावरणीय समतोल आणि जैवविविधता टिकवण्यासाठी ही मोहीम दीर्घकालीन हरित चळवळीचे रूप घेणार आहे.

Related Articles