विषारी दारू प्रकरणातील दोघांवर मकोका   

पुणे : विषारी गावठी दारू प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन संजीव धोत्रे (वय 24) आणि कल्पेश अशोक अगरवाल (वय 29) यांना विशेष मकोका न्यायालयाने 1 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, सखोल तपासासाठी आरोपींची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले.
 
हडपसर पोलिस ठाण्यात दाखल महाराष्ट्र दारूबंदी कायदा आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याची (मकोका) कलमे लावण्यात आली आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आर्यन धोत्रे आणि कल्पेश अगरवाल यांना न्यायालयात हजर करून 15 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. संघटित टोळीने आर्थिक फायद्यासाठी गावठी हातभट्टी दारूमध्ये मिथेनॉलसारखे विषारी रसायन मिसळून विक्री केली. या विषारी दारूच्या सेवनामुळे हडपसर आणि दापोडी परिसरातील एकूण 21 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे. काही नागरिक गंभीर आजारी पडल्याचेही तपास अहवालात म्हटले आहे.

Related Articles