संसदेत गदारोळ कायम   

नवी दिल्ली : राम मंदिर देणगी चोरी आणि विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या विषयावरून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अनेकदा गोंधळ घातला. त्यामुळे संसदेचे कामकाज मंगळवारी झाले नाही. लोकसभेत विनियोग विधेयक -२०२६ आणि राज्यसभेत जन्म- मृत्यू नोंदणी (सुधारित) विधेयक गदारोळात आणि आवाजी मतदानाने मंजूर झाले. 
 
लोकसभेत राम मंदिर देणगी चोरीचा मुद्दा विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मांडून घोषणा दिल्या. या गोंधळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विनियोग विधेयक २०२६ मांडले. त्या अंतर्गत सरकारी रोख्यांमधील परकीय गुंतवणुकीवरील प्राप्तिकर रद्द करणार्‍या अध्यादेशाची जागा घेणारे  ’कर आकारणी आणि इतर कायदे (सुधारणा) विधेयक, २०२६’ मांडले. मात्र, त्यावर बोलणार्‍यांची नावे सभापतींनी पुकारूनही सदस्यांनी त्यावर बोलणे टाळले. प्रारंभी सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासासाठी सहकार्य करावे, अशी विनंती केली. मात्र, विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गृहमंत्री अमित शहा यांनी विद्यार्थी आंदोलनातील पोलिस कारवाईबाबत उत्तर द्यावे, अशी मागणी केली. तसेच  घोषणा दिल्या. तेेव्हा कामकाज शांततेत पार पाडावे, अशी विनंती केल्याची आठवण बिर्ला यांनी केली. मात्र, गोंधळ सुरू राहिला होता. 
 
पावसाळी अधिवेशनात लोकसभेत आतापर्यंत पाच विधेयके मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी ’सार्वजनिक परीक्षा (अयोग्य मार्गांचा अवलंब रोखणे) सुधारणा विधेयक, २०२६’ आणि ’राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंधक (सुधारणा) विधेयक, २०२६’ यांना दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाली आहे. 
 
’जन्म-मृत्यू नोंदणी (सुधारणा) विधेयक, २०२६’, ’विनियोग (क्रमांक ३) विधेयक, २०२६’ आणि ’सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवणे, सुधारणा विधेयक, २०२६’,  ही विधेयके राज्यसभेत विचाराधीन आहेत.

राज्यसभेतही गोंधळामुळे कामकाज पडले बंद 

लोकसभेप्रमाणेच राज्यसभेचे कामकाजही वारंवार गोंधळामुळे तहकूब झाले. प्रथम दोन वाजेपर्यंत नंतर दिवसभरासाठी ते तहकूब झाले. राम मंदिर देणगी चोरीचा मुद्दा विरोधी पक्षांनी लावून धरत घोषणा दिल्या. तामिळनाडूचे माजी उप मुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या अटकेवरून द्रमुकच्या सदस्यांनी गोंधळ घातला. मात्र, सभापतींनी हा विषय राज्यपातळीवर असल्याचे सांगूनही सदस्य ऐकत नव्हते. त्यामुळे सभापती राधाकृष्णन यांनी कामकाज दुपारी दोन पर्यंत तहकूब केले. कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांनी ते सुरू ठेवण्यास विरोध केला होता. 

संसदेच्या आवारात निदर्शने

राम मंदिर देणगी चोरी आणि विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या विषयावरून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसदेबाहेर काल निदर्शने केली. त्यात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि विरोधी पक्षांचे खासदार सहभागी झाले. संसदेच्या मकर द्वाराबाहेर निदर्शन केली. तेव्हा देणगी चोरीच्या निषेधाचे फलक सदस्यांनी हाती धरले होते. तसेच देणगी चोर, गादी सोडा आणि अमित शहा उत्तर द्या, अशा घोषणा दिल्या. खासदारांनी प्रतीकात्मक देणगी पेट्या परिसरात ठेवल्या होत्या. देणगी चोरी झाली असल्याच्या घोषणा देत त्यांनी सरकारचा निषेध केला. प्रियांका गांधी यांच्यासह समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव आणि धर्मेंद्र यादव, तृणमूल काँग्रेसच्या सागरिका घोष, राजदचे संजय यादव आणि मनोज झा, आरएसपीचे एनके प्रेमचंद्रन यांच्यासह इतरांनीही या आंदोलनात भाग घेतला.
 

Related Articles