परराज्यातून वाढली मक्याच्या कणसांची मागणी   

दरातही वाढ; पर्यटनस्थळी किंमत 30 ते 50 रुपये  

पुणे : सर्वत्र कोसळत असलेल्या पावसामुळे पुणे विभागासह राज्य आणि परराज्यातील पर्यटन स्थळे पर्यटकांच्या गर्दीने गजबजली आहेत. पाऊस आणि गार वार्‍यामुळे पर्यटकांकडून गरमा गरम मक्याच्या कणसाला मागणी वाढली आहे. त्यामुळेच पुणे विभाग, राज्य आणि परराज्यातील पर्यटक ठिकाणांहून मक्याच्या कणसाला मागणी वाढली आहे. पर्यटनस्थळी एका कणसाची किंमत 30 ते 50 रुपये इतकी आहे. 
 
पुणे जिल्ह्यातील सिंहगड, खडकवासला, राजगड, तोरणा, मढेघाट, पानशेत, टेमघर, वरसगाव, नानेघाट, लोणावळा, पवना डॅम आदी पर्यटन स्थळांसह, हैदराबाद, अहमदाबाद आदी ठिकाणांहून मक्याच्या कणसांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. त्यामुळे दरातही वाढ झाली आहे. दोन दिवसांत पावसात घट होणार असल्यामुळे पर्यटन स्थळी पर्यटकांची आणखी गर्दी वाढणार असल्याने मक्याच्या कणसाला वाढलेली मागणी कायम राहणार असल्याचे सुपेकर यांनी नमूद केले. 
 
मार्केटयार्डातील बाजारात रोज 1200 ते 1500 गोण्यांची आवक होत असून दर्जानुसार प्रतिकिलोस 12 ते 20 रुपये भाव मिळत आहे. मागील वर्षी अवघ्या दहा ते बारा रुपये प्रतिकिलोेने मक्याच्या कणसांची विक्री होत होती. जून ते डिसेंबर पर्यंत मक्याच्या कणसांचा हंगाम असतो. बाजारात सध्या आवकही जास्त आहे. त्यामुळे मक्याची कणसे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. चांगल्या प्रतीच्या कणसांना ग्राहकांसह विक्रेत्यांकडून चांगली मागणी होत आहे. त्यामुळे दरही चांगला मिळत आहे. दीड महिन्यांपूर्वी घाऊक बाजारात 10 ते 15 रुपये प्रतिकिलोस भाव मिळत होता. मात्र, पाऊस सुरू होताच मागणी वाढली आहे. बाजारात कमी दर्जाच्या मालाचीही आवक होत आहे. बाजारात जिल्ह्यातील खेड, मंचर, नारायणगाव, बारामती भागातून आणि नाशिक, सोलापूर, नगर जिल्ह्यातून आवक होत आहे. 
 
यंदा उत्पादन अधिक 
 
राज्यभर सर्वत्र पाऊस सुरू आहे. त्यामुळे पर्यटन स्थळांवर गर्दी आहे. तंड वातावरणामुळे मक्याच्या कणसांना पर्यटकांकडून मागणी होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन जास्त आहे. तसेच मागणी जास्त असल्याने दरही अधिक आहेत.
- पांडुरंग सुपेकर, व्यापारी, मार्केटयार्ड.

Related Articles