मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज मोहिमेला नवी चालना   

’समृद्ध ग्रामसंवाद’ उपक्रमाची सुरुवात

पुणे : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज मोहिमेत राज्यात अव्वल कामगिरी कायम राखण्याच्या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेने एक अभिनव पाऊल उचलले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या संकल्पनेतून आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ’पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष समृद्ध ग्रामसंवाद’ हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 
 
या उपक्रमामुळे गावपातळीवर काम करणारे लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींना जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांशी थेट संवाद साधून समस्या मांडण्याची, सूचना देण्याची आणि विकासाच्या कल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज मोहिमेत पुणे जिल्ह्याने मागील वर्षी राज्यात उल्लेखनीय यश मिळवत आदर्श कामगिरीची नोंद केली होती. ग्रामपंचायतींचे सुशासन, लोकसहभाग, डिजिटल कार्यपद्धती, स्वच्छता, अभिलेख व्यवस्थापन आणि विविध विकासकामांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्ह्याने राज्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. याच यशाची परंपरा कायम ठेवण्यासाठी यंदाही मोहिमेतील कामकाज अधिक परिणामकारक आणि गुणवत्तापूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे.
 
असा आहे उपक्रम
 
’समृद्ध ग्रामसंवाद’ या उपक्रमांतर्गत दर महिन्यात दोन दिवस निवडक ग्रामपंचायतींसोबत थेट संवाद आयोजित केला जाणार आहे. सन 2025-26 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आणि चालू वर्षात मोहिमेत सक्रिय सहभाग घेत असलेल्या प्रत्येक तालुक्यातील एका ग्रामपंचायतीला या संवादासाठी निमंत्रित केले जाणार आहे. त्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच अथवा सदस्यांना आपल्या गावातील उपक्रम, यशस्वी प्रयोग आणि विकासकामांचा अनुभव मांडता येणार आहे.
 
या संवादात जिल्हा परिषदेचे विषय समिती सभापती, पंचायत समितीचे सभापती, माजी जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, महिला बचतगट ग्रामसंघ अध्यक्ष तसेच स्मार्ट स्कूल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. संवादादरम्यान सहभागी प्रतिनिधींना मोहिमेतील यशस्वी उपक्रमांचे सादरीकरण करता येईल. तसेच अंमलबजावणीतील अडचणी, स्थानिक पातळीवरील समस्या आणि प्रशासनाकडून अपेक्षित असलेल्या सहकार्याबाबत अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्याशी थेट चर्चा करता येणार आहे. 

Related Articles