अर्थव्यवस्था २०२९ पर्यंत गाठेल   

पाच ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा

सीतारामन यांचा विश्वास; नाणेनिधीच्या अंदाजानुसार धोरण

नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था २०२९ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) व्यक्त केला आहे. हा टप्पा गाठण्यासाठी सरकारने धोरणात्मक पावले उचलली असून विकासाचे धोरण निश्चित केले आहे, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली.  
 
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूकने एप्रिल २०२६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार भारताच्या सध्याच्या विकास दराचा विचार करता २०२८ -२०२९ मध्ये अर्थव्यवस्था ५.१ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार आहे, असे म्हटले आहे. त्याबाबतची माहिती सीतारामन यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने विस्तृत विकास धोरणावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामध्ये कृषी उत्पादन वाढ, उत्पादनांना प्रोत्साहन, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्येगांना पाठिंबा, पायाभूत सुविधांचा विस्तार करणे, मालवाहतुकीसाठी पोषक वातावरण आणि उद्योग सहज करता यावेत, अशी व्यवस्था करण्याचा समावेश आहे. सुटसुटीत प्राप्तिकर आकारणी, जीएसटीत सुधारणा, संशोधनाला चालना, डिजिटल यंत्रणेला चालना, मनुष्यबळाचे सशक्तीकरण केले जाईल आणि ऊर्जा सुरक्षेवर अधिक लक्ष देण्यात येईल. 
 
सार्वजनिक भांडवलाचा सातत्यपूर्ण विस्तार करून धोरण राबविणे, परदेशी गुंतवणूक मोकळीक, निर्यात वाढीला प्रोत्साहन, आर्थिक व्यवस्थापन करून मूलभूत सूक्ष्म अर्थव्यवस्था बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे. भारतीय व्यापाराचा विस्तार करण्यासाठी  मुक्त व्यापाराचे जाळे अधिक विस्तारले जाणार आहे. 
 
त्यासाठी सर्वंकष आर्थिक भागीदारी/सहकार्य करार केले जातील. मेक इन इंडियासह विविध योजनांना चालना दिली जाणार आहे. या वेळी त्यांनी विविध अर्थविषयक बाबींची माहिती दिली. 
 

Related Articles