दिल्ली विमानतळावर उतरताना एअर इंडियाच्या विमानाला अपघात   

काही प्रवासी जखमी; विमानाच्या छताला गेले तडे

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या थायलंड (फुकेट)-दिल्ली (एआय २३७९) विमानाला मंगळवारी सकाळी एक किरकोळ अपघात झाला. हे विमान दिल्ली विमानतळावर उतरत असताना उंची अचानक कमी झाल्याने विमानाला हादरे बसले. यात विमानातील काही प्रवासी आणि कर्मचारी जखमी झाले आणि विमानाच्या छताला तडे गेले. सकाळी ११ वाजल्यानंतर एअर इंडियाच्या एअरबस ॒३२० विमानातील १३४ प्रवाशांना वैद्यकीय सहाय्यासह विमानातून उतरवण्यात आले. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे १० प्रवासी आणि दोन कर्मचार्‍यांना विमानतळावरील मेदांता वैद्यकीय केंद्रात दाखल करण्यात आले आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट रोजी फुकेटहून दिल्लीला जाणारे विमान (॒एआय २३७९) हवेत असताना काही क्षणांसाठी हवेच्या दाबामुळे त्याच्या उंचीत बदल झाला. विमान दिल्लीत सुरक्षितपणे उतरले असून सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप उतरले आहेत. कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. किरकोळ दुखापत झालेल्या आणि वैद्यकीय तपासणीची आवश्यकता असलेल्या काही प्रवासी आणि कर्मचार्‍यांना खबरदारीचा उपाय म्हणून एअर इंडियाच्या विमानतळ टीम आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांकडून विमानतळावरील वैद्यकीय सुविधेसाठी केंद्रात नेण्यात आले. आमच्या प्रवासी आणि कर्मचार्‍यांची सुरक्षा हे एअर इंडियाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आम्ही बाधित झालेल्यांना सर्वांना आवश्यक मदत पुरवत आहोत. तपासाचा भाग म्हणून संबंधित अधिकार्‍यांसोबत पूर्ण सहकार्य करत आहोत, असेही एअर इंडिया प्रशासनाने सांगितले आहे.

नेमका अपघात कसा झाला?

थायलंडहून दिल्लीला जाणार्‍या एअर इंडियाच्या विमानाला तीव्र हवेच्या झोतांचा (टर्ब्युलन्स) फटका बसला. हा हवेचा टर्ब्युलन्स इतका विचित्र होता की काही प्रवाशांना कान आणि मानेला दुखापत झाली. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत एकूण १२ जण जखमी झाले आहेत. हवेच्या झोतांदरम्यान विमान त्याच्या निर्धारित उंचीपेक्षा ३०० फूट खाली आले.
 

Related Articles