तुकोबारायांच्या वारीचा प्रवास परतीच्या दिशेने   

वरवंड, (वार्ताहर) : धन्य झालो आम्ही जन्माचे| 
नाम घेऊ तुझे आवडीचे|
दीपावली तुझे पंढरी|
चालू झाली भक्ताची वारी॥ 
 
पंढरीच्या विठुरायाची भेट घेऊन देहूकडे निघालेला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा परतीच्या प्रवासाच्या मार्गातील दौंड तालुक्यातील  हिंगणीगाडा येथील मुक्काम उरकून मंगळवारी सायंकाळी वरवंड येथे दाखल झाला. यावेळी वरवंड-पाटसच्या सीमेवर भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. यानंतर तुकोबांचा पालखी सोहळा नवीन विठ्ठल मंदिरात दाखल होऊन मुक्कामासाठी विसावला.
 
बारामती पाटस पालखी मार्गावर परतीच्या प्रवासात वासुंदे, रोटी, गावचा प्रवास उरकून, पाटस घाटातून अवघड वळणे पार करताना जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे विलोभनीय दृश्य दिसत होते. दरम्यान, पालखी सोहळा पाटस येथील नागेश्वर मंदिरात विश्रांतीसाठी थांबला होता. यावेळी पाटस व परिसरातील नागरिकांनी रथातील पादुकांचे दर्शन घेतले. यानंतर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा परतीच्या दिशेने वरवंडकडे मार्गस्थ झाला.
 
यावेळी परतीच्या प्रवासात उर्वरित वारकरी तसेच विणेकरी यांना परतीचे वेध लागल्यामुळे पावलांची गती वाढली होती. परतीच्या मुक्कामी उर्वरित दिंडी व्यतिरिक्त जे वारकरी, इतरत्र आधाराला बसलेले असतात. तसेच पावसामुळे त्यांचे मुक्कामाच्या ठिकाणी हाल होऊ नये यासाठी वरवंड येथील पालखी तळावर भव्य निवाराशेड उभारण्यात आले होते. या निवाराशेड मुळे वारकरी तसेच वारी सोबत असलेल्या वारकर्‍यांची निवार्‍याची सोय झाल्यामुळे समाधान व्यक्त करत होते.
 

Related Articles