आकिब नबीची प्रथमच भारतीय कसोटी संघात निवड   

बुमराच्या जागी श्रीलंका दौर्‍यावर संधी

नवी दिल्ली : श्रीलंका दौर्‍यासाठी भारतीय कसोटी संघात मोठा बदल करण्यात आला असून, दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराच्या जागी वेगवान गोलंदाज आकिब नबीची निवड करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधून भारतीय संघात स्थान मिळवणारा तो तिसरा, तर कसोटी संघासाठी निवडला गेलेला पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. भारत-श्रीलंका दोन कसोटी सामन्यांची मालिका 15 ऑगस्टपासून गॉल येथे सुरू होणार आहे.
 
गुडघ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरता न आल्याने बुमराहला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. त्याच्या दीर्घ कारकिर्दीचा विचार करून कोणताही धोका पत्करू नये, असा निर्णय संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयने घेतला. 23 वर्षीय आकिब नबीने रणजी करंडक 2025-26 हंगामात दमदार कामगिरी केली होती. त्याने अवघ्या 10 सामन्यांत 60 बळी घेत सात वेळा एका डावात पाच बळींचा पराक्रम केला. गेल्या दोन रणजी हंगामांत त्याच्या नावावर एकूण 104 बळी आहेत.
 
उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम फेरीत मध्य प्रदेश, बंगाल आणि कर्नाटकविरुद्ध त्याने प्रभावी गोलंदाजी करत जम्मू-काश्मीरला इतिहासातील पहिले रणजी करंडक विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.आकिब नुकताच इंडिया ’अ’ संघासोबत श्रीलंका दौर्‍यावर गेला होता. तेथे त्याने दोन प्रथम श्रेणी सामन्यांत सहा बळी घेत निवड समितीचे लक्ष वेधून घेतले.शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंका दौर्‍यावर उतरणार असून, केएल राहुल उपकर्णधार असेल. यष्टिरक्षक म्हणून ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल यांचा संघात समावेश आहे. 
 
शमीचे भारतीय संघात परतणे अवघड !
 
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत अनुभवी मोहमद शमीऐवजी जम्मू-काश्मीरच्या युवा वेगवान गोलंदाज आकिब नबीची निवड करून अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने मोठा संदेश दिला आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या योजनांमध्येही शमीला स्थान नसल्याचे या निर्णयातून दिसून येत आहे. 
 
जसप्रीत बुमरा दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी तसेच इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यास मुकला. त्याच्या जागी अनुभवी शमीला संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र निवडकर्त्यांनी रणजी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणार्या आकिब नबीवर विश्‍वास दाखवला. गेल्या दोन रणजी हंगामांत नबीने सर्वाधिक बळी घेतले असून त्याच्या सातत्याची दखल घेत त्याला थेट राष्ट्रीय संघात स्थान देण्यात आले.

Related Articles