अटी मान्य करा; अन्यथा पुन्हा हल्ले करू   

ट्रम्प यांची इराणला धमकी 

वॉशिंग्टन : जर इराणच्या नेत्यांनी युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेच्या अटी लवकर मान्य केल्या नाहीत, तर तेहरानचे वीज प्रकल्प, तेल प्रकल्प यांसारख्या  महत्त्वाच्या भागांवर पुन्हा हल्ले करून ते ताब्यात घेण्याच्या तयारीत अमेरिकी सैन्य आहे, अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.  या धमकीचा उद्देश दबाव आणि गोंधळाच्या माध्यमातून वाटाघाटींना गती देण्याचा आहे. ट्रम्प यांनी इराणचे नेतृत्व मोडून काढण्यात आणि त्यांचे हवाई दल, नौदल नष्ट करणार्‍या अमेरिकन लष्कराच्या शौर्याची प्रशंसा केली. पण इराणला आशा आहे की, असे असूनही ट्रम्प यांच्यासमोर आम्ही टिकून राहू शकतो. कारण अमेरिकन मतदारांमध्ये ट्रम्प यांची लोकप्रियता कमी होत आहे. नोव्हेंबरमध्ये येथे होणार्‍या मध्यावधी निवडणुकांमध्ये त्यांना याचा फटका बसू शकतो. तसेच कमी होत चाललेला दारूगोळ्याचा साठा, यामुळे युद्ध लढण्यात अडचणी येत असून, अमेरिकेची स्थिती अधिकच बिकट होत आहे.ट्रम्प यांनी शुक्रवारी त्यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले की, वाटाघाटीत इराण विश्‍वास गमावत आहे. त्यामुळे अमेरिकन सैन्य त्यांच्यावर अतिशय जोरदार हल्ला करेल, असे त्यांनी नमूद केले. यानंतर काही तासांत व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी  एक निवेदन जारी करत म्हटले, इराणला याची किंमत चुकवावी लागेल, जोपर्यंत ते अर्थपूर्ण पद्धतीने चर्चेच्या टेबलावर येत नाही.

Related Articles