ढगफुटी सदृश्य पावसामुळे कारगिलमध्ये पूर   

रस्ते बंद झाल्याने संपर्क विस्कळीत

जम्मू/कारगिल : केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे कारगिल प्रदेशातील अनेक भागांमध्ये अचानक पूर आला आहे. यामुळे पायाभूत सुविधांचे नुकसान झाले असून, रस्ते बंद झाल्याने संपर्क विस्कळीत झाला असल्याचे अधिकार्‍यांनी सोमवारी सांगितले. अधिकार्‍यांनी सांगितले की, रविवारी संध्याकाळी कारगिल जिल्ह्यातील हरदास आणि तुमैल गावांमध्ये मुसळधार पावसामुळे अचानक पूर आला, ज्यामुळे निवासी भाग पाण्याखाली गेला. तसेच रस्ते आणि इतर सार्वजनिक पायाभूत सुविधांचे नुकसान झाले. या अचानक आलेल्या पुरामुळे लष्कर, पोलीस आणि नागरी प्रशासनाला मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यास भाग पडले. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती निवारण पथके तात्काळ बाधित भागांमध्ये पोहोचली असून, नुकसानीचा आढावा घेऊन मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.
 
लष्कराने सांगितले की, हरदासच्या गुंड भागात ढगफुटीनंतर आलेल्या अचानक पुरामुळे रस्ते बंद झाल्याने संपर्क विस्कळीत झाला आणि अनेक नागरिक या भागात अडकून पडले. यानंतर, ’फॉरएव्हर इन ऑपरेशन्स’ विभागाच्या जवानांनी तात्काळ मदत आणि बचाव कार्य सुरू केले. लष्करी अधिकार्‍यांनी सांगितले की, प्रतिकूल हवामानात सैनिकांनी बाधित गावकर्‍यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले. तसेच त्यांना प्रथमोपचारासह पिण्याचे पाणी, जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप केले.दुसर्‍या एका भागात लष्कराने नागरी प्रशासनाच्या सहकार्याने ढिगारा हटवण्यासाठी आणि रस्ते, पाणीपुरवठा व वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी मदत करण्यात आली आहे. 

Related Articles