लाखनगाव पूल पाण्याखाली; वाहतूक बंद   

मंचर, (प्रतिनिधी) : आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम भागात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे घोडनदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून बेल्हा- जेजुरी रस्त्यावरील लाखनगाव येथील पूल सोमवारी पाण्याखाली गेला. पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला असून काही वेळात वाहतूक पूर्णपणे बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
    
धरणातील पाणीसाठा सुमारे 90 टक्क्याहून अधिक झाल्याने सांडवा, उजवा कालवा, डावा कालवा तसेच घोडनदीपात्रात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदी दुथडी भरून वाहत असून लाखनगाव येथील बेल्हा-जेजुरी मार्गावरील जुन्या पुलावर पाणी आले आहे. धोकादायक परिस्थिती असूनही काही वाहनचालक पुलावरून वाहने नेण्याचा प्रयत्न करत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.प्रशासनाने अशा प्रकारचे धाडस टाळून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. 
 
दरम्यान, या ठिकाणी नवीन पुलाचे काम अनेक महिन्यांपासून सुरू असले तरी ते अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे दर पावसाळ्यात जुना पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक विस्कळीत होते. याचा नागरिक, शेतकरी आणि व्यापार्‍यांना मोठा फटका बसत असून स्थानिक व्यवसायांवरही परिणाम होत आहे. असे आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया संस्थेचे अध्यक्ष सतीश रोडे पाटील यांनी सांगितले. लाखनगाव येथील नवीन पुलाचे काम तातडीने पूर्ण करून हा कायमस्वरूपी प्रश्‍न सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Related Articles