भीमाशंकर आणि आहुपेच्या निसर्गसौंदर्याची पर्यटकांना भुरळ   

भीमाशंकर (वार्ताहर) : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले प्रसिध्द ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर आणि निसर्गरम्य आहुपे घाट सध्या पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये येथील निसर्ग अधिकच बहरत असल्याने, हिरवीगार शाल पांघरलेले डोंगर, धुक्याची दुलई आणि खळाळत वाहणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. भीमाशंकरच्या अभयारण्यात पावसाळ्यात निर्माण होणारे धुक्याचे साम्राज्य आणि घनदाट जंगल पर्यटकांना मंत्रमुग्ध करत आहे. धार्मिक दर्शनासोबतच इथल्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी तरूण वर्गासह कुटुंबेही मोठ्या प्रमाणावर येत आहेत. येथील गुप्त भीमाशंकर, कोकण कडा आणि नागफणी पॉईंटवरून दिसणारे दृश्य पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. तसेच भीमाशंकरकडे जाताना पोखरी घाटातून दिसणारा गोहे पाझर तलाव, डिंभे धरण परीसर व कोंढवळ येथील धबधबा पर्यटकांना अचंबित करत आहे. तर याच सह्याद्रीच्या कुशीतील दुसरे ठिकाण आहुपे घाट हा त्यांच्या अथांग आणि उंचावरून दिसणर्‍या दरीच्या दृश्यासाठी प्रसिध्द आहे. ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी आहुपे हे एक नंदनवनच बनले आहे. डोंगरावरून कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे आणि खाली पसरलेली हिरवीगार दरी पाहून पर्यटक भारावून जात आहेत. भीमाशंकर आणि आहुपे परिसरातील वातावरण सध्या खूपच नयनरम्य आहे. धुक्यात हरवून गेलेली वाट आणि धबधब्यांचा आवाज मनाला प्रचंड शांतता देतो, अशी प्रतिक्रिया मुंबईहून आलेले पर्यटक आदित्य पटेल, स्नेहा वर्मा यांनी दिली. 

Related Articles