भीमाशंकरमध्ये भाविकांची वाढती गर्दी   

मंचर, (प्रतिनिधी) : आषाढ महिना संपत आल्याने व श्रावण महिन्याची चाहूल लागल्याने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्तान, गुजरात आणि इतर राज्यांतूनही शिवभक्त दर्शनासाठी येत असल्याने मंदिर परिसरात भक्तांची वर्दळ वाढली आहे.
    
सध्या मंदिर परिसरात विविध विकासकामे सुरू असल्याने सकाळी 7 ते 11 या वेळेतच दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर विकासकामांसाठी मंदिर परिसरातील काही भाग बंद ठेवला जात असल्याने दुपारनंतर येणार्‍या भाविकांना दर्शन न घेता परत जावे लागत आहे. त्यामुळे अनेक भक्तांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः सुट्टीचे दिवस आणि श्रावणातील सोमवारच्या दिवशी हजारो भाविक भीमाशंकर येथे येत असल्याने चार तासांची दर्शन व्यवस्था अपुरी ठरत आहे. त्यामुळे विकासकामांचे योग्य नियोजन करून दिवसभर दर्शनाची व्यवस्था सुरू ठेवावी, अशी मागणी भाविक आणि स्थानिक व्यावसायिकांकडून वारंवार केली जात आहे.

Related Articles