खासगी वाहनांवर ‘पोलिस’ लिहिणार्‍यांवर कारवाई   

राज्यातील पोलिस आयुक्त आणि अधीक्षकांना कार्यवाहीच्या सूचना

मुंबई : खासगी वाहनांवर ‘पोलिस’ लिहिणे किंवा तशी पाटी लावणार्‍यांविरोधात आता कारवाई होण्याची शक्यता आहे. अप्पर पोलिस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाने या संदर्भात राज्यातील सर्व पोलिस आयुक्त आणि अधीक्षकांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.खासगी वाहनांवर ‘पोलिस’ अशी पाटी असल्यामुळे अशा वाहनांची तपासणी अनेकदा टाळली जाते. याचा गैरफायदा घेत अवैध वस्तूंची वाहतूक, दहशत निर्माण करणे किंवा अन्य बेकायदेशीर कृत्यांसाठी अशा वाहनांचा वापर होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या पार्श्‍वभूमीवर अशा पाट्यांवर निर्बंध घालण्याची मागणी करण्यात आली होती.या संदर्भात सखाराम कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानंतर महाराष्ट्र पोलिस महासंचालक कार्यालयामार्फत हा प्रस्ताव अप्पर पोलिस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
 
पत्रानुसार, अनेक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी आपल्या खासगी दुचाकी व चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ अशी लाल रंगातील पाटी किंवा अक्षरे लावून वाहन चालवितात. या प्रकाराबाबत मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, खासगी वाहनांवर   ‘पोलिस’ लिहिलेले वाहन आढळल्यास महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 133(6) तसेच मोटार वाहन अधिनियम, 1988 मधील कलम 177 अंतर्गत कारवाई करण्याबाबत संबंधित पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षकांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.या निर्णयामुळे खासगी वाहनांवर अधिकृत परवानगीशिवाय ‘पोलिस’ अशी ओळख दर्शविणार्‍या पाट्या लावणार्‍यांना आळा बसणार आहे. 

Related Articles