कचरा वाहतुकीसाठी 250 घंटागाड्या आणि 15 बीआरसी वाहने   

पुणे : महापालिका प्रशासनाने शहरातील झाडणकामासाठी मनुष्यबळ दुप्पट केल्याने रस्ते स्वच्छता दिसू लागली आहे. परंतु झाडणकामात गोळा झालेला कचरा वाहून नेणार्‍या वाहनांची संख्या कमी असल्याने कचरा रॅम्पवर कचर्‍याचे प्रमाण वाढले आहे.  दरम्यान, कचरा वाहतूक करण्यासाठी लवकरच 250 घंटागाड्या तसेच आणखी 15 बीआरसी वाहने लवकरच भाडेतत्वावर घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. वाहने वाढल्यास कचरा वाहतुकीचा प्रश्‍न मार्गी लागेल, असा दावा अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी केला आहे.
 
महापालिकेच्या हद्दवाढीनंतर झाडणकाम करणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या अपुरी पडू लागल्याने प्रशासनाने प्रायोगीक तत्वावर एक ऑगस्टपासून कर्मचार्‍यांची संख्या जवळपास दुप्पट केली आहे. सुमारे 9 हजार कर्मचारी शहरातील रस्ते आणि झाडणकाम हद्दींची स्वच्छता करणार असल्याने  दररोज 200 टन अतिरिक्त कचरा गोळा होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. 
 
रस्ते स्वच्छतेची जबाबदारी पूर्णत: ठेकेदारावर देण्यात आली असून अस्वच्छता आढळल्यास ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तीन महिन्यांसाठी प्रायोगीक तत्वावर राबविण्यात येणार्या या उपक्रमाला तीन दिवसांपुर्वी सुरूवात झाली आहे. मनुष्यबळ वाढविण्यात आल्याने तसेच ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करण्यात आल्याने रस्त्यांवर स्वच्छता दिसू लागली आहे. अतिरिक्त कर्मचारी संख्येमुळे सुमारे 200 टन अतिरिक्त कचरा गोळा होउ लागला आहे. हा कचरा वाहून नेण्यासाठी पुरेशी वाहने नसल्याने रॅम्पवर रांगा लागत आहेत, अशी तक्रार ठेकेदार करू लागले आहेत.
 
यासंदर्भात अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजीत नायर यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले, कचरा वाहतूक करणार्‍या घंटागाड्यांनी दिवसांत सुमारे साडेसहा फेर्‍या करणे अपेक्षित आहे. परंतु वाहनांची संख्या कमी असल्याने 5 फेर्‍या होत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात कचरा उचलण्यास आणि तो रॅम्पवर व पुढे प्रक्रिया प्रकल्पांवर नेण्यास विलंब होत आहे. शहरात गोळा होणार्‍या कचर्‍याचे प्रमाण आणि वाहतुकीची गती विचारात घेता आणखी 250 घंटागाड्या आणि 30 कॉम्पॅक्टर वाहनांची गरज आहे. ही वाहने भाडेतत्वार घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. झाडणकाम  आणि कचरा वाहतुकीची घडी बसविण्यासाठी पुढील पंधरा दिवसांत प्रयत्न करण्यात येतील, असेही नायर यांनी सांगितले.

Related Articles