लोणावळ्यात मुसळधार पाऊस: भुशी, तुंगार्ली, लोणावळा धरण भरले   

वलवण धरणातून विसर्गाची शक्यता, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

लोणावळा (वार्ताहर): लोणावळा शहर आणि परिसरात पावसाचा जोर कायम असून मुसळधार पावसामुळे जलसाठ्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 112 मि.मी. पावसाची नोंद झाली, तर त्यानंतर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 76 मि.मी. पावसाची भर पडली आहे. या जोरदार पावसामुळे शहरातील प्रमुख भुशी, तुंगार्ली आणि टाटा कंपनीचे लोणावळा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. लोणावळा धरणातून खोपोली वीज केंद्राकडे सातत्याने पाण्याचा विसर्ग सुरू ठेवून कंपनी व्यवस्थापन परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण ठेवून आहे.
 
वलवण धरणात 88.92% पाणीसाठा;48 तासांत विसर्ग शक्य
 
टाटा पॉवरच्या खोपोली वीज केंद्राचे प्रमुख दीपक महाबळे यांनी पुणे जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या पत्रातील माहितीनुसार, 3 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7:00 वाजता वलवण धरणाची जलाशय पातळी 633.85 मीटर असून 64.132 द.ल.घ.मी. म्हणजेच 88.92% पाणीसाठा जमा झाला आहे. पाणलोट क्षेत्रातील सततच्या पावसामुळे पुढील 48 तासांत धरणाची पाणीपातळी अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणाच्या स्वयंचलित द्वारांयुक्त सांडव्यावरून नदीपात्रात नियंत्रित स्वरूपात पाण्याचा विसर्ग सुरू होऊ शकतो.
 
पर्यटक आणि नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा
 
धरणातून विसर्ग सुरू करण्यापूर्वी लाऊडस्पीकरद्वारे इशारा दिला जाणार आहे. धरणाच्या खालील बाजूस असणारा नाला व नॅशनल हायवेवरील मोरीच्या ठिकाणी नाल्याचे पात्र अरुंद असल्याने सखल भागात पाणी पसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जैन मंदिर भाग, जुना मुंबई-पुणे हायवे आणि खत्री पार्क वसाहत या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून आपत्कालीन यंत्रणा, पोलीस प्रशासन आणि स्थानिक नगरपालिकेलाही सतर्क करण्यात आले आहे.

Related Articles