आंद्र धरण प्रकल्पासाठी नगरपरिषदेला साडेतीन एकर जागा   

तळेगाव दाभाडे (वार्ताहर ) : शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या आंद्र धरण पाणी प्रकल्पासाठी आवश्यक फिल्टर प्लँट व पाणी साठवण टाकीसाठी लागणारी सुमारे साडेतीन एकर जागा ’सोसायटी ऑफ सर्व्हंट ऑफ गॉड’ संस्थेने नगरपरिषदेला उपलब्ध करून दिली आहे. या जागेची सरकारी मोजणी रविवारी नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील व संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत करण्यात आली.सरकारी मोजणीवेळी ’सोसायटी ऑफ सर्व्हंट ऑफ गॉड’ संस्थेचे सचिव लाला घनशानी, प्रभुलाल चोथानी, डॉ. सचिन नवले,नगरसेवक शिवाजी आगळे, निखिल भगत, सत्यम खांडगे, सूरज सातकर आदी उपस्थित होते.
 
आमदार सुनील शेळके यांच्या विशेष प्रयत्नांतून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागत असून, वाढत्या लोकसंख्येला शुद्ध व मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा असल्याची माहिती नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी दिली.या प्रकल्पासाठी आंध्र धरणातून तळेगावसाठी दरवर्षी 5.094 दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. प्रकल्पांतर्गत दररोज 22 दशलक्ष लीटर पाण्याचा उपसा करण्यात येणार असून 15 लाख लीटर क्षमतेची पाणी साठवण टाकी आणि 20 दशलक्ष लीटर क्षमतेचा अत्याधुनिक फिल्टर प्लँट उभारण्यात येणार आहे.
 
या प्रकल्पामुळे शहरातील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी होऊन नागरिकांना नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. शहराच्या दीर्घकालीन पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, त्याची कामे वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला जाणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले. ही जागा नगरपरिषदेच्या ताब्यात मिळवून देण्यासाठी नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, नगरसेवक इंदरशेठ ओसवाल, चिराग खांडगे, निखिल भगत, सत्यम खांडगे व सचिन नवले यांनी विशेष प्रयत्न केले.

Related Articles