ज्ञानेश्‍वरी यादवला 30 लाखांचे बक्षीस; पोलिस उपअधिक्षकपदी निवड   

रायपूर : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 53 किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग प्रकारात रौप्य पदक जिंकून देशाचा आणि छत्तीसगडचा गौरव वाढवणार्‍या ज्ञानेश्वरी यादवचा राज्य सरकारकडून मोठा सन्मान करण्यात आला आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी ज्ञानेश्वरीला 30 लाख रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस आणि डीएसपी पदावर विशेष पदोन्नती देण्याची घोषणा केली.
 
राजनांदगाव येथील ज्ञानेश्वरी यादव सध्या पोलीस विभागात सहायक उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील तिच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर मुख्यमंत्री निवासस्थानी तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तिच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे कौतुक करत ही कामगिरी राज्याच्या क्रीडा इतिहासातील अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले.महिलांच्या 53 किलो वजनी गटात ज्ञानेश्वरीने एकूण 199 किलो वजन उचलत रौप्य पदक पटकावले. मर्यादित सुविधा आणि अनेक अडचणींवर मात करत तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले यश हे राज्यातील तरुणांसाठी, विशेषतः मुलींसाठी प्रेरणादायी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
 
ज्ञानेश्वरीने आपल्या यशामागे कुटुंबाचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. तिचे वडील तिला सायकलवरून जिममध्ये घेऊन जात असत आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच ती या स्तरापर्यंत पोहोचल्याचे तिने नमूद केले.डीएसपी पदावर पदोन्नती मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत ज्ञानेश्वरीने भारत आणि छत्तीसगडचे नाव आणखी उंचावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी तयारी करण्याचे तिचे पुढील लक्ष्य 
आहे.

Related Articles