बुमराहच्या अनुपस्थितीमुळे निवड समिती नाराज   

सेंटर ऑफ एक्सलन्सच्या दुखापत व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्‍ली : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेला मुकणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारतीय क्रिकेटमधील दुखापत व्यवस्थापन प्रणाली पुन्हा चर्चेत आली आहे. सेंटर ऑफ एक्सलन्स आणि भारतीय वरिष्ठ निवड समिती यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे.माहितीनुसार, सुरुवातीला निवड समितीला बुमराह 15 ऑगस्टपासून सुरू होणार्‍या कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असेल, अशी माहिती देण्यात आली होती. मात्र, नंतर त्याची दुखापत अपेक्षेपेक्षा गंभीर असल्याचे समोर आल्याने त्याला संघाबाहेर ठेवावे लागले. यामुळे निवड समितीने नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.या पार्श्वभूमीवर सोमवारी व्हीव्हीएस लक्ष्मण, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि सीओईच्या वरिष्ठ अधिकार्‍यांमध्ये खेळाडूंच्या दुखापत व्यवस्थापनावर आभासी बैठक झाली. नितीन पटेल यांच्या निवृत्तीनंतर बीसीसीआयच्या क्रीडा विज्ञान विभागाचे प्रमुख पद रिक्त असल्याने सीओईच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी आणि साई सुदर्शन यांच्या तंदुरुस्तीबाबतही सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. 

Related Articles