नॉर्थ झोनचा संघ जाहीर; आयुष बडोनीवर मोठी जबाबदारी   

दुलीप ट्रॉफी 2026

नवी दिल्‍ली : दुलीप ट्रॉफी 2026 स्पर्धेसाठी नॉर्थ झोनने आपल्या संघाची घोषणा केली असून, कन्हैया वधावन याच्याकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर दिल्लीचा युवा अष्टपैलू आयुष बडोनी याची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली असून, त्याच्यावर फलंदाजीसह नेतृत्वाचीही महत्त्वाची जबाबदारी असणार आहे.नॉर्थ झोनच्या संघात अर्शदीप सिंग, अंशुल कंबोज, अब्दुल समद, यश धूल आणि निशांत सिंधू यांसारख्या युवा आणि अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरचा यष्टीरक्षक-फलंदाज कन्हैया वधावन प्रथमच या स्पर्धेत संघाचे नेतृत्व करणार आहे.
 
मात्र, पंजाबचा प्रतिभावान फलंदाज उदय सहारन याला संघात स्थान न मिळाल्याने निवडीबाबत चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे, भारतीय कसोटी संघाच्या दृष्टीने अर्शदीप सिंगला अधिक संधी मिळावी या उद्देशाने त्याचीही संघात निवड करण्यात आल्याचे मानले जात आहे. वेगवान गोलंदाजी अधिक भक्कम करण्यासाठी अंशुल कंबोज आणि जम्मू-काश्मीरच्या युद्धवीर सिंह यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.फलंदाजीत आयुष बडोनी, अब्दुल समद, यश धूल, कामरान इकबाल आणि सनत सांगवान यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. फिरकी अष्टपैलू म्हणून निशांत सिंधू संघाला संतुलन देणार आहे.
 
नॉर्थ झोन संघ : कन्हैया वधावन (कर्णधार), आयुष बडोनी (उपकर्णधार), सनत सांगवान, कामरान इकबाल, यश धूल, आयुष दोसेजा, अब्दुल समद, निशांत सिंधू, अर्जुन शर्मा, आबिद मुश्ताक, अर्शदीप सिंग, सुनील कुमार, अंशुल कंबोज, युद्धवीर सिंह आणि निखिल कश्यप.

Related Articles